ओळख बदलल्याने आरोपींचा शोध कठीण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींनी स्वतःची ओळख बदलली आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होत आहे, अशी कबुली सीआयडी आणि सीबीआयने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींनी स्वतःची ओळख बदलली आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होत आहे, अशी कबुली सीआयडी आणि सीबीआयने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

सीआयडीच्या वतीने पानसरे यांच्या हत्येसंबंधित तपास अहवाल विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी दाखल केला. या प्रकरणात काही नवीन संशयितांची नावे उघड झाली आहेत. मात्र, त्यांनी बेकायदा मोबाईल मिळवले असून, घर आणि नावेही बदलली आहेत. त्यामुळे त्यांचा तपास लावणे कठीण होत आहे. सीबीआयच्या वतीनेही अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनीही दाभोलकर हत्येच्या तपासाचा अहवाल दाखल केला. आरोपींच्या मोबाईलवरून त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण त्यात अडचणी येत आहेत, असे त्यांनी सांगितले. आरोपींचा तपास करा आणि त्यांना अटक करा; अन्यथा तपास यंत्रणेबाबत चुकीचा संदेश जाऊ शकेल, असा इशारा न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने दिला. आरोपींच्या तपासासाठी अद्ययावत यंत्रणेचे साह्य घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. तसेच राष्ट्रीय तपास पथकाच्या अधिकाऱ्यांकडूनही मार्गदर्शन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

सीबीआयचे संचालक या प्रकरणात देखरेख ठेवत आहेत, असे या वेळी सिंग यांनी सांगितले. दाभोलकर आणि पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी तपासाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी एक मार्चला होणार आहे. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये, तर पानसरे यांची हत्या फेब्रुवारी 2015 मध्ये झाली होती.

तपास यंत्रणांना सुनावले
डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या प्रकरणांमध्ये गुन्हेगार मोकाट सुटले, तर अन्य गुन्ह्यांवरही त्याचा परिणाम होतो. अशाने गुन्ह्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे यातील आरोपींना त्वरित जेरबंद करा, असे न्यायालयाने तपास यंत्रणांना सुनावले.

Web Title: mumbai news identity accused searching