परदेशांत पार्सल पाठवणाऱ्यांची गैरसोय

किरण कारंडे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - टपाल विभागाकडून राज्यात सुरू होणारी "इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट सर्व्हिस' (आयटीपीएस) बारकोड प्रिंटिंगमध्ये चुका झाल्याने रखडली आहे. राज्यभरातील टपाल विभागांत तांत्रिक दोष असलेले बारकोड पाठवण्यात आले आहेत, त्यामुळे नवी सेवा सुरू होण्याआधीच चर्चेत आली आहे. "टपाल सप्ताहा'च्या निमित्ताने या सेवेची घोषणा झाली; परंतु अंमलबजावणीतील अडचणीमुळे दिवाळीसारखा महत्त्वाचा कालावधी विभागाच्या हातून निसटला.

"आयटीपीएस' सेवेद्वारे पार्सल शेवटच्या व्यक्तीला मिळेपर्यंत ते कुठे आहे हे शोधणे शक्‍य होणार आहे. हे ट्रॅकिंग बारकोडमुळे शक्‍य होते; पण टपाल विभागाकडून पार्सलसाठीचे बारकोडच तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी ही सेवा सुरू झालेली नाही. चुकीचे बारकोड राज्यभर वितरित झाले. वितरणाआधी त्याची चाचणी झाली नव्हती. आता सेवा सुरू करण्याच्या वेळी बारकोड स्कॅनिंगच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे हे दोष असलेले बारकोड पुन्हा मागवण्याची वेळ विभागावर आली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून काही ठिकाणी तातडीने हे बारकोड देण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहे.
नवे बारकोड प्रिंट होण्यासाठी आणखी चार दिवस लागतील. या बारकोडचे वितरण करण्यासाठी आणखी आठवडा लागेल असे समजते.

12 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पार्सल (100 ग्रॅम वजन) अवघ्या 330 रुपयांत पाठवण्याची सुविधा "आयटीपीएस' सेवेमुळे मिळणार आहे. आशियाई देशांत पार्सल पाठवण्याची सुविधा टपाल विभागाने काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. बारकोडमुळे पार्सल वेळोवेळी ट्रॅक करणे शक्‍य होईल. सध्याच्या टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय सेवांच्या तुलनेत ही सर्वांत स्वस्त सेवा आहे.

यंत्रणा चुकल्याची कबुली
"आयटीपीएस' यंत्रणेत सगळी भिस्त बारकोडवर आहे. फॉर्म्युला चुकल्यामुळे दोष असणारे बारकोड प्रिंट झाले, अशी माहिती मुंबई विभागाचा अतिरिक्त भार असणारे पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्‍वर यांनी दिली. सॉफ्टवेअर वापरून स्कॅनिंग करताना हा दोष दिसून आला. लवकरच नवे बारकोड टपाल विभागाच्या सर्व कार्यालयांत उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: mumbai news Inconvenience to parcel senders abroad