जायचे होते इंदूरला, पोचला नागपूरला !

पीटीआय
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघालेला प्रवासी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्याच विमानात बसून नागपूरला पोचल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीने तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

मुंबई - इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघालेला प्रवासी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्याच विमानात बसून नागपूरला पोचल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीने तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी इंडिगोच्या विमानाचे तिकीट काढले होते. तो शुक्रवारी (ता.12) विमानतळावर पोचल्यानंतर त्याला "चेक इन' वेळी इंदूरला जाणाऱ्या विमानाचा बोर्डिंग पास देण्यात आला. त्यानंतर इंडिगोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या प्रवाशाला इंदूरला जाणाऱ्या विमानात बसविण्याऐवजी नागपूरला जाणाऱ्या विमानात बसविले. हा प्रवासी नागपूरला पोचल्यानंतर ही बाब त्याच्या निदर्शनास आली.

या घटनेला इंडिगो कंपनीने दुजोरा दिला आहे. विमानात प्रवासी सोडणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रवाशाचे सामान इंदूरवरून मागवून त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

याआधीही हलगर्जीपणा
गेल्या वर्षी नागरी हवाई वाहतूक सुरक्षा यंत्रणेने इंडिगो कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राचा परवाना निलंबित केला होता. या केंद्रात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना अनेक महिने एकच प्रश्‍नसंच वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. कंपनीने नव्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबत त्यांची परीक्षा घेण्याची हमी दिल्यानंतर केंद्राच्या परवान्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.

Web Title: mumbai news indigo flight issue

टॅग्स