जिजामाता उद्यानातील प्रवेश शुल्क 50 रुपये?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क पाच रुपयांवरून 100 रुपये करण्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे हे शुल्क 50 रुपये केले जाण्याची शक्‍यता आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. 26) स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असून, त्या वेळी हा पर्याय पुढे केला जाण्याची शक्‍यता आहे.

उद्यानातील पेंग्विन दालनाचे वीज बिल महिन्याला 10 लाखांचे असते. त्यांच्या देखभालीसाठीही लाखोंचा खर्च होत असल्याचा दावा करत प्रशासनाने प्रवेश शुल्क पाच रुपयांवरून 100 रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला. तो बाजार व उद्यान समितीने मंजूर केल्यानंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या दरवाढीला विरोध करण्यास सुरवात केली. यावर शुक्रवारी स्थायी समितीत चर्चा होणार आहे. शिवसेनेला हा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत मंजूर करायचा आहे; मात्र अन्य पक्षांचा विरोध असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.

फक्त पेंग्विन आणून प्रवेश शुल्क कसे काय वाढवता येईल, असा प्रश्‍न विचारत याबाबत स्थायी समितीत भूमिका मांडू, असे भाजपचे गटनेते मनोज कोटक म्हणाले. उद्यानात प्रवेशासाठी कमी शुल्क असले पाहिजे. पेंग्विन पाहण्यासाठी वेगळे शुल्क आकारता येईल, असे रवी राजा म्हणाले.

या उद्यानात सकाळी फिरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यांच्याकडून महिन्याकाठी एक हजार रुपये घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. या नागरिकांना मोफत प्रवेश द्यावा, असा पर्याय स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news jijamata garden entry fee 50 rupees