भाजपने केली केडीएमटीची पोलखोल; सेना-भाजपमध्ये रंगला कलगीतुरा 

मयुरी चव्हाण काकडे
मंगळवार, 25 जुलै 2017

केडीएमटीची सेवा किती तत्पर आहे याचा आज प्रत्यय आला असून स्वागतासाठी परिवहन सभापती रिकामी बस घेऊन आले आहेत.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या रेल्वेला समांतर असणाऱ्या रस्त्यावर सोमवारपासून परिवहन बस सेवा सुरू होण्याचा पहिला दिवस होता. मात्र, मंगळवारी ही सेवा चांगलीच वादग्रस्त ठरली. या बससेवेच्या स्वागतासाठी खंबाळपाडा येथे बसची प्रतीक्षा करत उभे असलेल्या नगरसेवकांचा चांगलाच पारा चढला. तब्बल दोन तास वाट पाहूनही नियोजित वेळेत बस न आल्याने भाजप आणि शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगला. 

कल्याण डोंबवली शहरांना जोडणारा पर्यायी रस्ता म्हणून या समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या परिसरात नागरिकीकरण वाढल्यामुळे या मार्गावरून बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता बससेवेचे स्वागत करण्यासाठी भाजपाचे स्थानिक नगरसेवक साई शेलार, निलेश म्हात्रे, विनोद काळण, राजन आभाळे तसेच भाजपाचे परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी, भाजप पदाधिकारी राजू शेख, शशिकांत कांबळे व नागरिक कल्याणहून डोंबिवलीला जाणाऱ्या बसची वाट पाहात उभे होते. ही बस खंबाळपाडा परिसरातील बालाजी आंगण येथील सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी बालाजी आंगण येथे पोहचणे अपेक्षित होते. मात्र, ही बस तब्बल दोन तासाने या थांब्यावर पोहचल्याने उपस्थित भाजपाच्या मंडळींचा चांगलाच पारा चढला. या प्रकराची कुणकुण शिवसेनेचे सभापती संजय पावशे यांना लागताच त्यांनी तातडीने सूत्रे हलवली. अखेर आयत्यावेळी रिकाम्या बस घेऊन येण्याची नामुष्की सभापतींवर ओढावली.

केडीएमटीची सेवा किती तत्पर आहे याचा आज प्रत्यय आला असून, स्वागतासाठी परिवहन सभापती रिकामी बस घेऊन आले आहेत, असा टोला लगावत नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी लगावत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले.।या मार्गावरील बससेवा नव्याने सुरू झाली असून ती सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागतील. बसचे स्वागत करण्यात येणार आहे याबाबतची कल्पना अगोदरच दिली असती तर पहिलेच नियोजन केले असते अशी प्रतिक्रिया परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी व्यक्त केली. 

Web Title: mumbai news kalyan dombivali KDMT bus transport bjp shiv sena