'बेस्ट'प्रमाणे 'KDMT' आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकच करावा

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

परिवहन कामगार कर्मचारी संघटनेची मागणी 

बेस्टप्रमाणे केडीएमटीचा अर्थसंकल्प कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा

कल्याण : केडीएमटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून मुंबईमधील बेस्ट उपक्रमाच्या धर्तीवर केडीएमटीचा अर्थसंकल्प कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प विलीन करावा, अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अर्थात केडीएमटी सेवा सन 1999 मध्ये सुरुवात झाली. आजमितीस या सेवेस 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. केडीएमटी परिवहन उपक्रम हा आहे त्या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून इतर सार्वजनिक सेवेच्या स्पर्धेत आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्याचा प्रयन्त करीत आहे. 

मुंबईच्या एम एम आर डी क्षेत्रात असलेल्या मनपाच्या परिवहन सेवा फायद्यात नसून तोट्यात असून त्यात केडीएमटीचा ही समावेश आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केडीएमटी उपक्रम सुरू झाला त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनुदान ही दिले आहे. मात्र विविध कारणास्तव होणाऱ्या संचलन त्रुटीमुळे केडीएमटी उपक्रमआर्थिकदृष्ट्या सबळ नाही, त्यामुळे विविध परिवहन उपक्रमास त्या त्या मनपा ने आर्थिक सहाय्य द्यावे असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

मागील 18 वर्षात परिवहन उपक्रमातील ठेकेदारकाची देणी, कर्मचाऱ्यांची देणी, शासकीय देणी आदी कोट्यावधी रुपयांची देणी थकीत असल्याने अनेक वेळा बस डेपो बाहेर काढणे कठीण झाले आहे.काही महिन्यापूर्वी आर्थिक स्थिती ढासळल्याने बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई मनपामध्ये विलीन करण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,  त्या धर्तीवर केडीएमटी उपक्रमाचा अर्थसंकल्प कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याअर्थसंकल्पात विलीन करण्यात यावा, यामुळे केडीएमटी उपक्रम सुधारेल अशी आशा परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केली असून आता पालिका आयुक्त पी वेलरासु काय निर्णय घेतात याकडे लक्ष्य लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news kalyan dombivali KDMT bus transport budget