शिवसेनेच्या वामन म्हात्रेंचा राजीनामा राष्ट्रवादीने दिला

रविंद्र खरात 
सोमवार, 31 जुलै 2017

भ्रष्टाचार, टक्केवारी असे आरोप करत म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांसह मातोश्रीवरही राजीनामा पाठवला होता.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या राजीनाम्याने अडचणीत आलेल्या सत्ताधारी पक्षाला आज राष्ट्रवादी काँग्रेसने एक धक्का दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी हा राजीनामा डोंबिवलीतील सेतू कार्यालयात नेऊन दिला आहे. 

भ्रष्टाचार, टक्केवारी असे आरोप करत म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांसह मातोश्रीवरही राजीनामा पाठवला होता. महापौरांनी आपण त्यांची समजूत काढली असून एकत्र बसून काम करु असे म्हात्रे यांना सांगितले आहे. मात्र तरीही वामन म्हात्रे आपल्या निर्णयानुसार ठाम आहेत. सत्तेत असूनही कामे होत नसल्याची त्यांची खंत आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर स्वकीय गुपचुप असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुधीर वंडार पाटील यांनी हा राजीनामा चक्क सेतू कार्यालयात दिला आहे. 

आपण हा राजीनामा उघडपणे सर्वांना दिला आहे, तो आता कोणी परत नेऊन देत असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही असे यावर प्रतिक्रिया देताना वामन म्हात्रे म्हणाले. सेतू कार्यालयात हा राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले कि, एका जेष्ठ आणि अनुभवी नगरसेवकाने केलेल्या आरोपांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. अधिकारी काम करत नाहीत कि सत्ताधारी कामात कमी पडत आहेत हे नागरिकांना समजले पाहिजे. यामुळे आपण हा राजीनामा प्रशासनापर्यंत पोहोचवला आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: mumbai news kalyan dombivli shiv sena vaman mhatre