रस्त्यात येणारे कल्याणमधील गणपती मंदिर पालिकेने केले जमीनदोस्त

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

गणेशोत्सवानंतर हे गणपती मंदिर तोडण्यासाठी पालिकेने कायदेशीर पूर्तता पूर्ण केली होती.

कल्याण : कल्याण पूर्वमधील 37 वर्षे जुने प्रसिद्ध गणपती मंदिर रस्त्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालय न्यायालयाच्या आदेशानुसार आज (मंगळवार) सकाळी पालिका अधिकारी वर्गाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले, यावेळी अनेक गणेश भक्तांचे भावना अनावर झाल्या होत्या .

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने पालिकाहद्दीत सर्वोच्च न्यायालय आदेश नुसार रस्त्यात येणाऱ्या प्रार्थना स्थळ हटविण्याची मोहिम हाती घेतली आहे. कल्याण पूर्व मध्ये कोळसेवाडी मध्ये गणपती चौकात 37 वर्ष जुने गणपती मंदिर आहे. ते रस्त्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश नुसार पालिका अधिकारी 18 ऑगस्ट रोजी तेथे गेले असता नागरिकांनी विरोध केला होता. त्यावेळी गणेशोत्सव नंतर आम्ही स्वतः मंदिर बाजूला करतो असे लिखित दिल्याने पालिका पथक परत गेले होते. गणेशोत्सवानंतर हे गणपती मंदिर तोडण्यासाठी पालिकेने कायदेशीर पूर्तता पूर्ण केली होती. त्यानंतर आज मंगळवार ता 19 सप्टेंबर सकाळी 8 च्या सुमारास पालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, भागाजी भांगरे, भारत पवार, वसंत भोंगाडे यांच्यासमवेत पालिका कर्मचारी वर्ग कडेकोट पोलीस बंदोबस्त घेऊन घटना स्थळी आले यावेळी प्रथम गणपती बाप्पाची मूर्ती सन्मानपूर्वक प्रभागक्षेत्र कार्यालय मध्ये नेण्यात आली, तद्नंतर 2 जेसीबीच्या सहाय्याने मंदिरावर कारवाई करण्यात आली .

कडेकोट पोलीस बंदोबस्त मुळे विरोध मावळला...
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ पाटील यांच्यासमवेत 3 पोलीस निरीक्षक, 8 पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, 57कर्मचारी, 30 महिला कर्मचारी, एसआरपी 1 तुकडी आदींचा कडेकोट बंदोबस्त होता, कारवाई पूर्वी पोलिसांनी गणपती मंदिर परिसराचा ताबा घेतल्याने विरोध मावळला होता तर कारवाई दरम्यान अनेक गणेश भक्तांच्या भावना अनावर झाल्या, अनेक महिलांना अश्रू रोखता आल्या नाही ...परिसर ही गँभिर झाला होता यात पालिकेने कारवाई केली.

वाहतूक बदल आणि सकाळी चाकरमानीची पायपीट...
गणपती चौकात कारवाई करण्यात येणार असल्याने त्या परिसर रिक्षा स्थानक बंद होते तर वाहतूक मध्ये बदल करण्यात आल्याने कल्याण पूर्व मधील गीता हरकीसनदास रुग्णालय पासून नागरिकांना पायपीट करत रेल्वे स्टेशन गाठावे लागले .

न्यायालयाचा अवमान...
न्यायालयाने गणपती मंदिर बाबत स्थगती दिली असताना पालिकेने मंदिर जमीन दोस्त केल्याने न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप हनुमान सेवा मंडळ विश्वस्त विष्णू जाधव यांनी केला असून याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली .

Web Title: mumbai news kalyan east ganesh temple demolished