गृहमंत्र्यांच्या दरबारी नेवाळी दंगलीचा मुख्य आरोपी

मयुरी चव्हाण काकडे
रविवार, 25 जून 2017

चैनू जाधव यांचा सेनेच्या बड्या नेत्यांसोबत असलेला फोटो व्हायरल झाल्यामुळे मुख्य आरोपी असलेल्या जाधव याच्यावर वजनदार राजकीय नेत्यांचा वरदहस्त तर नाही ना असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण : कल्याण -नेवाळी विमानतळाच्या जागेवरून गुरुवारी नेवाळी परिसरात हिंसक आणि उग्र आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनातील आंदोलकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नेवाळी दंगलीतील मुख्य आरोपी चैनू जाधव हेदेखील शिवसेनेच्या नेत्यांसोबत गृहमंत्र्यांच्या दरबारी उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

चैनू जाधव हे नेवाळी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष तथा नेवाळी पाड्याचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्यासह इतर शेकडो आंदोलनकर्त्यांवर सशस्त्र दंगल माजविणे व इतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जाधव हे सशस्त्र दंगलीच्या गुन्हयातील मुख्य आरोपी असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. मात्र , शनिवारी साक्षात दंगलीचा मुख्य आरोपी हा सेनेच्या शिष्टमंडळा सोबत गृहमंत्र्यांच्या दरबारी उपस्थित असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. 

* नेवाळी आंदोलनाच्या सुरवातीपासूनच शिवसेना भाजपाच्या एक पाऊल पुढे राहिली आहे.  भाजपचे स्थानिक पदाधिकारी , नेते वगळता अद्याप एकही बडा नेता नेवाळी दौ-यावर आला नाही. भाजपाचे डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनीदेखील या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. शिवसेनेने थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नेवाळी प्रकरणी साकडे घातले असल्यामुळे या आंदोलनावरून सत्ताधारी पक्षांमध्ये काही मतभेत तर नाहीत ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 

* चैनू जाधव यांचा सेनेच्या बड्या नेत्यांसोबत असलेला फोटो व्हायरल झाल्यामुळे मुख्य आरोपी असलेल्या जाधव याच्यावर वजनदार राजकीय नेत्यांचा वरदहस्त तर नाही ना असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या आरोपीपर्यंत पोलिस प्रत्यक्षात पोचतील का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

* आतापर्यंत या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड कोटी रुपये नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: mumbai news kalyan newali riots agitation