कमला मिलप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल आगप्रकरणी शनिवारी (ता. 20) अटक झालेल्या तीन आरोपींना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी न्यायालयाने दिले. याप्रकरणी मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अहवाल केल्यांनतर पोलिसांनी कमला मिलचा भागीदार रवी सुरजमल भंडारी, अग्निशामक दलाचा अधिकारी राजेंद्र पाटील; तसेच एक हुक्का कंत्राटदार उत्कर्ष पांडे यांना अटक केली होती.

कमला मिल कंपाउंडमधील अनेक बेकायदा बांधकामांबाबत भंडारी यांना माहिती होती, असे मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात नमूद आहे. या कंपाउंडमधील "मोजोस ब्रिस्ट्रो' तसेच "वन अबोव्ह' हे पब बंद टेरेसवर सुरू होते, याची माहिती पाटील यांना होती. असे असतानाही त्यांनी हे पब उघड्या टेरेसवर सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाला दिली होती. आग लागण्याच्या काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी हा अहवाल सादर केला होता, असेही मेहता यांनी अहवालात नमूद केले आहे; तर कोणतीही परवानगी नसतानाही पांडे या पबना हुक्का पुरवत असे, असा आरोप त्याच्यावर आहे. हुक्‍क्‍याच्या ठिणगीमुळे आग लागून 14 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद आहे.

याप्रकरणी यापूर्वी अटकेत असलेल्या "वन अबोव्ह' व "मोजोस ब्रिस्ट्रो'च्या मालकांच्या चौकशीत या प्रकरणात या तिघांचाही सहभाग असल्याचे उघड झाले होते. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आमच्या अशिलांचा या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आगप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे.

Web Title: mumbai news kamala mill case accused police custody