कमला मिल सीबीआय चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल आग प्रकरणात 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्यास मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार कॉंग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपालांकडे केली. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी स्पष्ट मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने या वेळी केली.

विखे पाटील म्हणाले, की मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरुद्ध कारवाई केली जात नाही. आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्निशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या भ्रष्ट, निष्क्रिय व उदासीन कारभारामुळेच कधी आग लागून, तर कधी इमारत कोसळून निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या मृत्यूंसाठी केवळ पालिकेचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याने आयुक्तांसह सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर भादंविच्या 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली.

Web Title: mumbai news kamala mill fire cbi inquiry