सदस्यांच्या रडारवर अभियंते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कल्याण - महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या त्रयस्थ समितीच्या कामकाजाचा कालावधी वाढवून त्यांची नेमणूक पुन्हा करण्याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी हरकत घेतली. शहरातील काँक्रीट रस्त्यांची दुरवस्था आणि त्याबाबत त्रयस्थ समितीने काय भूमिका घेतली? याचा जाब विचारत सदस्यांनी या वेळी शहर अभियंत्यांनाच फैलावर घेतले. 

कल्याण - महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या त्रयस्थ समितीच्या कामकाजाचा कालावधी वाढवून त्यांची नेमणूक पुन्हा करण्याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी हरकत घेतली. शहरातील काँक्रीट रस्त्यांची दुरवस्था आणि त्याबाबत त्रयस्थ समितीने काय भूमिका घेतली? याचा जाब विचारत सदस्यांनी या वेळी शहर अभियंत्यांनाच फैलावर घेतले. 

शहरातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या प्रकल्पासाठी विशेष त्रयस्थ तांत्रिक लेखा परीक्षक म्हणून पालिका प्रशासनाने मुंबईतील व्हीजेटीआय यांची नेमणूक केली होती. या नेमणुकीस आणखी एक वर्ष मुदतवाढ देऊन यासाठी लागणारा २३ लाख ६० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला; मात्र शहरात ठिकठिकाणी असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांना तडे गेले असून, त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत आतापर्यंत या समितीने काय केले, असा प्रश्‍न भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी उपस्थित केला. त्याला सदस्य दशरथ घाडीगावकर, माधुरी काळे व उपेक्षा भोईर यांनीही दुजोरा दिला.  

अनेक ठिकाणी काँक्रीट रस्त्यांचे पृष्ठभाग उखडले असून, त्याच्या गुणवत्तेबाबत सदस्यांनी शंका उपस्थित करत पालिकेचे शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांना याबाबत जाब विचारला. त्यावर संबंधित त्रयस्थ लेखा परीक्षक समितीने रस्त्यांबाबत ज्या ज्या सूचना केल्या आहेत, त्या प्रशासनाने अमलात आणल्या असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. नियमानुसार  त्रयस्थ तांत्रिक लेखा परीक्षकाची नेमणूक करण्यात आली असून, ती अनिवार्य आहे. 

समितीने रस्त्यांवरील मार्क केलेल्या विशिष्ट भागांवर वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले; मात्र रस्त्यांबाबत संबंधित समितीने काय अहवाल दिला आहे? याचे स्पष्टीकरण द्या, अशी मागणी भोईर यांनी केली. इतर सदस्यांनीही अहवाल सभेसमोर मांडण्याबाबत आग्रह धरला. अहवाल प्रशासनाला मिळाला असून, तो स्थायी समितीला सादर केला जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. रस्त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी तूर्तास या विषयाला स्थगिती दिली.

गोल्डन गॅंग चर्चेत 
पालिकेतील शिवसेनेच्या गोल्डन, सिल्व्हर व लोखंडी गॅंगने पालिका लुटल्यामुळे पालिकेची विकासकामे रखडल्याचे विधान कल्याण-पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी केल्यामुळे खळबळ उडाली होती. स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनीही सभेत संबंधित कंत्राटदाराची बिले मंजूर करून एकप्रकारे पालिकेतील ‘सोनेरी टोळी’लाच मदत करण्यात आल्याचे सांगितल्यामुळे पालिका वर्तुळात पुन्हा गोल्डन गॅंगची चर्चा रंगली आहे.

Web Title: mumbai news KDMC