केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

उतारवयातही साथ 
हा नंदीबैल शेतीच्या कामासाठी नाही. त्याच्या मदतीने मनोरंजनाचे खेळ करतो. त्यावर २२ वर्षे कुटुंबाची उपजीविका होत आहे. आता तो उतारवयाकडे झुकला आहे. त्याचे समोरचे दात पडले आहेत. त्यामुळे त्याला चारा भरवावा लागतो.

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे... त्यामुळे त्याला मुंबईत आणले आहे... पाणावलेल्या डोळ्यांनी अंकुश गोंडे सांगत होते. अंकुश यांच्या भावजयीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयाचे ठोके अनियमित आहेत. या गंभीर स्थितीमुळे तिला उपचारासाठी परळ केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. काही दिवसांपासून केईएम हॉस्पिटलसमोर एक मोठ्या आकर्षक शिंगांचा आणि धष्टपुष्ट नंदीबैल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या दर्शनामागील मन हेलावणारी ही कहाणी.

हा नंदीबैल २२ वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबात आला. त्यानंतर तो कुटुंबाचा सदस्य झाला. अनेक सुख-दु:खात त्याने साथ दिली. याआधीही तो मुंबईत आला होता. मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायक आदी धार्मिक स्थळी त्याला दर्शनासाठी आणले होते. दक्षिणेत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीही त्याला घेऊन गेलो होतो. आतापर्यंतच्या शेकडो मैलांच्या प्रवासात त्याने लाखोंना आशीर्वाद दिले आहेत. त्याच्यावर अनेकांची श्रद्धा आहे; पण आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे, असे अंकुश यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

‘आमचे कुटुंब बीड जिल्ह्यातील आहे. भावजयीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयाचे ठोके अनियमित आहेत, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर संपूर्ण कुटुंबच खचले होते; पण आम्ही चांगल्या उपचारासाठी केईएममध्ये आलो. आता प्रकृतीत सुधारणा होत आहे, ही आनंदाची बाब आहे’, असे सांगताना अंकुश यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. 

मुंबईत आसरा नाही, म्हणून केईएम हॉस्पिटलसमोरील मैदानात गेल्या आठवडाभरापासून राहत आहोत. हॉटेल, लॉजवर राहणे परवडत नाही, म्हणून जेवणही इथेच तयार करतो. भावजयीची आई सोबत आहे. ती जेवण करून देते, असे अंकुश यांनी सांगितले. 

या नंदीबैलाच्या आशीर्वादाची आमच्या कुटुंबाला आवश्‍यकता आहे. ते मिळतील, असा आमचा विश्वास असल्याचे ते सांगतात. 

Web Title: mumbai news kem hospital