घणसोलीतील रस्ते एलईडीने उजळणार! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली नोडमधील रस्त्यांवर पहिल्यांदाच महापालिका एलईडी दिवे बसवणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच कोटींची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव उद्या (ता. 18) महासभेच्या पटलावर येणार आहे. 

नवी मुंबई - सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली नोडमधील रस्त्यांवर पहिल्यांदाच महापालिका एलईडी दिवे बसवणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच कोटींची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव उद्या (ता. 18) महासभेच्या पटलावर येणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही सिडकोकडेच राहिलेल्या घणसोली नोडची दुरवस्था झाली होती. महापालिका हद्दीमुळे सिडकोने घणसोली नोडकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे पायाभूत सुविधांचा हवा तसा विकास झाला नव्हता. महापालिकेने घणसोली नोडकडे लक्ष द्यावे, यासाठी अनेकदा शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलने केली होती. त्याचे पडसाद महासभा व स्थायी समितीच्या सभेत उमटले होते. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर घणसोली नोडचे हस्तांतर झाल्यानंतर आता रस्त्यांच्या कामासह रस्त्यांवरील दिवे बदलण्याचे काम महापालिका सुरू करणार आहे. घणसोली नोडमध्ये सिडकोने 1994-95 मध्ये रस्त्यांवर दिव्यांची सोय केली होती. सिडकोने घणसोलीतील रस्त्यांवर सोडियम व्हेपरचे दिवे लावले असून त्यांना 22 पेक्षा अधिक वर्षे झाल्याने खांब व त्यावरील फिटिंग खराब झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने सोडियम व्हेपरच्या दिव्यांऐवजी एलईडी दिवे बसवण्याचे ठरवले आहे. यासाठी महापालिकेने सुमारे दोन कोटी 52 लाख 67 हजारांची तरतूद केली आहे. यात 11 मीटरचे 35 आणि नऊ मीटरचे 11 खांब, 100 वॉटचे 601; तर 150 वॉटचे 21 एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. 

पायाभूत सुविधांसाठी 51 कोटी 
घणसोली नोडमध्ये सेक्‍टर 1 ते 7 व सेक्‍टर 9 येथे नागरी सुविधांची कामे करण्याकरिता 51 कोटी 75 लाख सहा हजार 965 रुपयांची तरतूद असलेला प्रस्ताव महासभेच्या पटलावर येणार आहे. या प्रस्तावाअंतर्गत सात हजार 208 मीटर लाबींचे पावसाळी गटार, एक हजार 926.27 मीटर लांबीचे रस्ते व 12 हजार 614 मीटर लांबीचे फूटपाथ तयार करण्यात येणार आहेत. यात 16 हजार 93 मीटर लांबीच्या युटिलिटी डक्‍टचाही समावेश आहे. 

Web Title: mumbai news led lamp