42 दिवसांनी बिबट्याला पकडण्यात यश 

42 दिवसांनी बिबट्याला पकडण्यात यश 

मुंबई - तब्बल 42 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर फिल्मसिटीत बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. फिल्मसिटी आणि आरे कॉलनीत सलग दोन हल्ले झाल्यानंतर परिसरात असलेला नर बिबट्याचा वावर वन विभागाने लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. काही वर्षांपासून वन विभागाचे स्वयंसेवक ट्रॅप कॅमेऱ्यातून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या टीमच्या मदतीनेच नर बिबट्याचा सहावा हल्ला होण्याअगोदरच आम्ही त्याला पकडण्यात यशस्वी झालो. 42 दिवसांची मेहनत सफल झाली अन्यथा सहावा हल्ला झाल्यानंतर बिबट्याला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचा आदेश येण्यापासून रोखता आले नसते, असे मुंबई उपनगर विभागाचे मानद वन्यजीव रक्षक मयूर कामत यांनी सांगितले. 

22 जुलैला फिल्मसिटीत बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांचा विहान गरुड ठार झाला. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला; मात्र बिबट्या पिंजऱ्यात अडकत नव्हता. काही दिवसांनंतर आरे कॉलनीत बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने तेव्हा कोणतीही दुर्घटना घडली नाही; मात्र कॅमेरा ट्रॅपमध्ये आरे आणि फिल्मसिटीच्या परिघात नर बिबट्याचा सततचा वावर दिसत होता. फिल्मसिटीनंतर आरेत बिबट्याच्या हालचाली वाढल्यानंतर त्याला पकडण्याचे आव्हान अजूनच अवघड होऊन बसले होते. आरेत मादी बिबट्या तिच्या पिलांसह फिरत असल्याने चुकून त्यांच्यापैकी कोणी पिंजऱ्यात अडकले असते किंवा सहावा हल्ला झाल्यानंतर बिबट्याला मारण्याचा आदेश आला असता तर सगळेच कठीण होऊन बसले असते. त्यामुळे 42 दिवस बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून तो पिंजऱ्यात येणे आव्हानात्मक होते, अशी माहिती वन विभागासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणारे वन्यजीव संशोधक राजेश सनप यांनी दिली. 

पिंजरा हलवला नि बिबट्या अडकला 
आरे कॉलनीत मानवी वस्ती वाढत असल्याने बिबट्या पिंजऱ्याजवळ येत नव्हता. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी विशेष कंट्रोल रूमही उभारण्यात आल्या. बुधवारी फिल्मसिटीत मध्यरात्री स्वयंसेवकांच्या गाडीसमोरूनच नर बिबट्या फिरत होता. त्याच्या हालचाली टिपताना फिल्मसिटीचा बहुतांश भाग त्याने झाडांना नखे मारून आपला प्रदेश केल्याचे मयूर कामत यांनी टिपले. निरीक्षणानंतर हेलिपॅडवर लावण्यात आलेला पिंजरा हलवून पुलाजवळ ठेवण्यात आला गेला आणि नर बिबट्या 24 तासांत त्यात अडकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com