आरेत बिबट्याचा दोन महिलांवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

झोपडीत असलेल्या दुसऱ्या एका 42 वर्षीय महिलेच्या हाताला बिबट्याने चांगलाच चावा घेतला. या घटनेने घाबरलेल्या दोन्ही महिलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. या आवाजाने बिबट्याने घटना स्थळावरून धूम ठोकली

मुंबई  - आरेत चाफ्याचा पाडा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिलेवर बिबट्याने शनिवारी रात्री नऊच्या आसपास बिबट्याने हल्ला केला. चाफ्याचा पाडा येथे तात्पुरत्या बांधलेल्या शौचालयात महिला गेली असताना बिबट्याने हा हल्ला केला. 

मात्र या हल्ल्यात ही महिला सुदैवाने बचावली. जीव मुठीत धरून पळताना बिबट्याही मागोमाग पळाला. जवळपास दहा मीटर बिबट्याने या महिलेचा पाठलाग केला. मदतीच्या आशेने महिला नजीकच्या झोपडीत शिरली. बिबट्याही मागोमाग आला. झोपडीत असलेल्या दुसऱ्या एका 42 वर्षीय महिलेच्या हाताला बिबट्याने चांगलाच चावा घेतला. या घटनेने घाबरलेल्या दोन्ही महिलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली.

या आवाजाने बिबट्याने घटना स्थळावरून धूम ठोकली. या घटनेत 42 वर्षीय महिलेला जास्त दुखापत झाल्याने तिला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याचा हल्ला झालेल्या पहिल्या महिलेच्या कंबरेवर किरकोळ जखमा झाल्या आहेत. यंदा आरे व नजीकच्या परिसरात बिबट्याचे सहा हल्ले झाले आहेत. चाफ्याचा पाड्यातच बिबट्याचे दोनदा हल्ले झाले. जुलै महिन्यात फिल्मसिटीत बिबट्याच्या हल्ल्यात विहान गरूडा या अडीच वर्षाच्या मुलाने जीव गमावला होता. त्यानंतर जवळपास 42 दिवसानंतर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला.

Web Title: mumbai news: leopard attacks women

टॅग्स