सिंह देता का सिंह?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

गुजरात वनविभागाने दत्तक योजनेंतर्गत आम्हाला सिंहाची जोडी द्यावी. त्यांच्या मिलनातून जन्माला येणारे दोन बछडे आम्ही गुजरात वनविभागाला देऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे.
- डॉ. शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, नॅशनल पार्क

नॅशनल पार्कची कर्नाटक, गुजरातला विनंती
मुंबई - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 25 वर्षांपूर्वी पन्नासहून अधिक सिंह संचार करीत होते, असे सांगितले तर खोटे वाटेल; पण ते खरे आहे. सध्या तीनच सिंह लायन्स सफारीचा गाडा ओढत असल्याने नॅशनल पार्कला आणखी काही सिंह हवे आहेत.

नॅशनल पार्कमध्ये सध्या जुळे भाऊ-बहीण जेस्पा व गोपा आणि वृद्ध झालेला रवींद्र असे तीनच सिंह आहेत. त्यांच्या जीवावर लायन्स सफारी कशीबशी सुरू आहे. सहावर्षीय जेस्पा आणि गोपा ही जुळी भावंडे असल्याने त्यांचे मीलन घडवून आणणे कायद्याने गुन्हा ठरतो. रवींद्र आणि गोपाचे दीड वर्षात तीनपेक्षा जास्त वेळा मीलन झाले; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे इतर प्राणिसंग्रहालयांतून सिंह आणणे, हा एकमेव पर्याय वनविभागाकडे आहे.

सफारीसाठी आणखी काही सिंहाची आवश्‍यकता असल्याने वनविभागाने कर्नाटकातील बनेरगट्टा प्राणिसंग्रहालय, राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि गुजरात वनविभागाकडे सिंह देण्याची विनंती केली आहे; परंतु सहा महिन्यांपासून गुजरात वनविभागाशी सुरू असलेली याबाबतची चर्चा अपेक्षित प्रतिसादाअभावी थांबली आहे.

गुजरात वनविभागाकडे नॅशनल पार्क प्रशासनाने सिहांच्या दोन जोड्या देण्याची विनंती केली आहे; परंतु त्यांच्या बदल्यात नॅशनल पार्कने खास प्रकल्प राबवून संवर्धित केलेल्या सहा रस्टी स्पॉटेड मांजरांच्या दोन जोड्या गुजरात वनविभागाने मागितल्या आहेत; परंतु दोन जोड्या दिल्यावर नॅशनल पार्कमध्ये केवळ दोन नर राहतील. त्यामुळे प्रशासनाने या अदलाबदलीला नकार दिल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

Web Title: mumbai news lion demand by national park