चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांवरही नजर

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

मुंबई - मोबाईल चोरांवर, तसेच ते विकत घेणाऱ्यांवर आता रेल्वे पोलिस लक्ष ठेवून आहेत. पोलिसांच्या आकडेवारीनुसार तिन्ही मार्गांवर यंदा सुमारे 18 हजार मोबाईल चोरीला गेले. पोलिसांनी तीन हजार चोरट्यांना अटक केली. पूर्वी प्रवासात फोन गहाळ झाल्यास फक्त नोंद केली जात असे. आता पोलिस फक्त चोरीचा गुन्हा दाखल करतात. गहाळ झालेल्या अथवा चोरलेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती मिळावी, याकरता रेल्वे पोलिसांनी खास कक्ष उघडला आहे. तिथे तांत्रिक अभ्यास करून मोबाईलची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला पुरवली जाते.

लोकलमध्ये महागड्या मोबाईलवरच चोरट्यांचा डोळा असतो. हे मोबाईल चोरटे स्वस्तात विकतात. पश्‍चिम रेल्वे पोलिसांनी आता स्वस्तात चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत अशा 63 जणांवर कारवाई केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. चोरीचे मोबाईल विकत घेणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. पश्‍चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांत मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक आहे.

काही दिवस तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर चोरटे पुन्हा चोऱ्या करण्यासाठी रेल्वे स्थानकांत येतात. पूर्वी चोरटे प्रवाशाच्या शर्ट किंवा पॅंटच्या खिशातून मोबाईल चोरत असत. आता पाठीवर बॅग लटकवणाऱ्या प्रवाशांना चोरटे लक्ष्य करतात. लोकलमध्ये घुसत असताना त्यांच्या बॅगमधून चोरटे मोबाईल काढून घेतात. सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अधिक चोऱ्या होतात.

सुट्या भागांची विक्री
स्मार्टफोनमधील फीचर्समुळे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे चोरटे आता चोरलेल्या स्मार्टफोनमधील महागडे सुटे भागच विकू लागले आहेत. डिस्प्ले, आयसी, माइकसारखे भाग चोरटे स्वस्तात विकतात. दक्षिण मुंबईतील "चोर बाजारा'त शुक्रवारी पहाटे चोरीचे मोबाईल सर्रास विकले जातात.

रेल्वेत मोबाईल चोरी अधिक
"राज्य गुन्हे अन्वेषण अहवाल 2016' नुसार गतवर्षी मुंबईत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांत चोरीची तीन हजार 71 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राज्यभरात रेल्वेतून नऊ हजार 956 मोबाईल चोरीला गेले. त्यापैकी तीन हजार 445 मोबाईल परत मिळवण्यात यश आले. रेल्वेत लॅपटॉप गहाळ होण्याच्या आणि चोरीच्या एक हजार 745 घटना घडल्या. पोलिसांनी त्यातील 282 लॅपटॉप शोधून काढले.

Web Title: mumbai news A look at those who buy theft mobile