मुंबईमध्ये अग्नितांडव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

लोअर परेलच्या कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेत 14 मृत्युमुखी; 55 जखमी 
मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमधील ट्रेड हाउस येथील इमारतीत लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 55 जण जखमी झाले. गुरुवारी (ता. 28) रात्री 12.30 वाजता तेथील वन अबो पबमध्ये ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 11 महिला आणि दोन अनिवासी भारतीय भावंडे आहेत. काही क्षणात उग्ररूप धारण केलेल्या आगीशी अग्निशामक दलाला तब्बल साडेसहा तास झुंज द्यावी लागली. मृतांपैकी अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. 

लोअर परेलच्या कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेत 14 मृत्युमुखी; 55 जखमी 
मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमधील ट्रेड हाउस येथील इमारतीत लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 55 जण जखमी झाले. गुरुवारी (ता. 28) रात्री 12.30 वाजता तेथील वन अबो पबमध्ये ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 11 महिला आणि दोन अनिवासी भारतीय भावंडे आहेत. काही क्षणात उग्ररूप धारण केलेल्या आगीशी अग्निशामक दलाला तब्बल साडेसहा तास झुंज द्यावी लागली. मृतांपैकी अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. 

कमला मिल कंपाउंडमधील ट्रेड हाउस इमारतीत गुरुवारी रात्री वन अबो पब ऍण्ड रेस्टॉरंटमध्ये आग लागली. ऊन, पावसापासून संरक्षण व्हावे याकरिता या रेस्टॉरंटमधील मोकळ्या जागेत बांबू आणि प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचे छप्पर उभारण्यात आले होते. आगीत या छप्परने पेट घेतला आणि अवघ्या सात-आठ मिनिटांत ते खाक झाले. प्रचंड वाढलेली आग आणि प्लॅस्टिकच्या धुराचे मोठे लोट उठल्याने रेस्टॉरंटमधील अनेकांना तेथून बाहेर पडता आले नाही. वन अबोमध्ये लागलेल्या आगीचे लोळ काही क्षणात शेजारील मोजोस ब्रिस्ट्रो पबपर्यंत पोचले. या वेळी तिथे 100 हून अधिक जण होते.

घटनास्थळी आग नियंत्रणाकरिता कोणतीही यंत्रणा नव्हती. तसेच, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गिकांवर साहित्य ठेवलेले होते. त्यामुळे अनेक जण अडकून राहिले. अनेकांनी शौचालयाच्या दिशेने धाव घेतली. पण, तेथून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यामुळे 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यात 11 महिला आणि दोन अनिवासी भारतीय भावंडांसह वन अबो रेस्टॉरंटच्या वेटरचा समावेश आहे. बहुतांश जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दुर्घटनेत 55 जखमी झाले आहेत. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ इंजिन, पाच जंबो, सात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री एकच्या सुमारास या आगीला "लेवल तीन'ची आग घोषित करण्यात आले. इमारतीतील निमुळत्या रस्त्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे 5 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास आग पूर्णपणे विझली. मात्र, धुराचे लोट परिसरात दूरवर पसरल्याने खबरदारी म्हणून अनेकांनी कार्यालये रिकामी केली. परिसरात टीव्ही नाइन, टाइम्स नाऊ यांसारख्या प्रसिद्धिमाध्यमांची कार्यालयेही आहेत. तेथेही धूर पसरला होता. टीव्ही नाइनच्या कार्यालयात धूर पसरल्याने तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

...तर जीवितहानी टळली असती 
कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीत केलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे स्थानिक कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. त्यांनी 10 ऑक्‍टोबरला महापालिकेकडे तक्रार केली होती. त्या वेळी संबंधित इमारतीत कोणतेही बेकायदा बांधकाम झाले नसल्याचा दावा पालिकेने केला. कशाळकर यांच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. 

10 दिवसांत दुसरी दुर्घटना 
18 डिसेंबरला साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात भानू फरसाण कारखान्याला पहाटे लागलेल्या भीषण आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत दुसरी भीषण दुर्घटना घडल्याने महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपण उघडकीस झाला आहे.

आगीच्या घटनेनंतर... 
- आगीतील मृतांमध्ये 11 महिला, दोन अनिवासी भारतीय भावंडांसह एका वेटरचा समावेश 
- आगीच्या सखोल चौकशीचे तसेच दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना आदेश 
- महापालिकेचे पाच अधिकारी निलंबित; सहायक आयुक्तांची तडकाफडकी बदली 
- अनधिकृत हुक्का बारमुळे ही आग लागली असावी, असा एका जखमीचा दावा 
- वन अबो रेस्टॉरंटमधून आगीला सुरवात झाल्याची काही जणांची माहिती 
- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा पोलिसांचा अंदाज; नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही 
- आगीच्या न्यायालयीन चौकशीची, तसेच मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची सीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी 
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला

मुंबईतील आगीची दुर्घटना अस्वस्थ करणारी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

या घटनेमुळे मला तीव्र दु:ख झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या या दु:खाच्या प्रसंगात मी त्यांच्याबरोबर आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मुंबईमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरित चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. 
- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष 

ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आग लागलेल्या मनोरंजनगृहाचा चालक दोषी आढळल्यास त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाईल. परवानगी दिलेल्या मनोरंजनगृहांसारख्या ठिकाणांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे, तसेच अनधिकृत ठिकाणांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

या घटनेत प्राण गमावलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर आराम पडो, अशी प्रार्थना मी करत आहे. 
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल

Web Title: mumbai news lower parel kamala mills fire 14 died and 55 injured