खंडग्रास चंद्रग्रहण 7 ऑगस्टला दिसणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - येत्या सोमवारी (ता. 7) श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी बुधवारी दिली.

मुंबई - येत्या सोमवारी (ता. 7) श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी बुधवारी दिली.

हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप खंड; तसेच पश्‍चिम पॅसिफिक महासागरातून दिसेल. ग्रहणाच्या दिवशी मुंबईत सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चंद्रोदय होईल. त्या वेळी चंद्रबिंब 99.6 टक्के प्रकाशित दिसेल. रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजेच चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास सुरवात होईल. रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी ग्रहण मध्य होईल. त्या वेळी चंद्रबिंबाचा 24.6 टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल. त्यानंतर ग्रहण सुटण्यास सुरवात होईल. रात्री 12 वाजून 49 मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण सुटेल, असे सोमण यांनी सांगितले.

खग्रास सूर्यग्रहण 21 ऑगस्टला
श्रावण अमावास्येला (21 ऑगस्ट) खग्रास सूर्यग्रहण होणार आहे; परंतु ते ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खग्रास सूर्यग्रहण हवाई, उत्तर पूर्व पॅसिफिक महासागर, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, युरोपचा पश्‍चिमेकडील भाग आणि पश्‍चिम आफ्रिका येथून दिसेल. पुढील वर्षी 31 जानेवारीला होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसेल, असेही सोमण यांनी सांगितले.

Web Title: mumbai news Lunar eclipse will appear on August 7