मोतेवार यांची मालमत्ता जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

हेलिकॉप्टरसह चार राज्यांतील 207 कोटींच्या मालमत्तेचा समावेश

हेलिकॉप्टरसह चार राज्यांतील 207 कोटींच्या मालमत्तेचा समावेश
मुंबई - महेश मोतेवार यांच्या "समृद्ध जीवन फूड्‌स इंडिया लिमिटेड' व संबंधित कंपन्यांचे एक हेलिकॉप्टरसह चार राज्यांतील 207 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली. कंपन्यांनी राबवलेल्या गुंतवणूक योजनेतून पैसे घेऊन तो पैसा बांधकाम व्यवसाय, हॉस्पिटालिटी, सॉफ्टवेअरसह मीडिया व्यवसायात गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोतेवार यांच्या "समृद्ध जीवन' या योजनेत वीस लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. त्यातून जनावरांचे पालनपोषण व खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठा परतावा देणाचे आमीष दाखवल्यामुळे सुमारे 3500 कोटी रुपये जमा झाले होते. पुणे गुन्हे शाखेने याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून "ईडी'नेही 2016 मध्ये याप्रकरणी मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. "ईडी'च्या तपासात गुंतवणूकदारांची ही रक्कम मोतेवार व त्यांच्यासंबंधित व्यक्तींच्या 34 कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यातून जमिनी, व्यवसायिक कॉम्प्लेक्‍स, हॉटेल्स, रिसॉर्टस्‌, सदनिका, बंगले अशा मालमत्ता विकत घेण्यात आल्याचेही तपासात समजले. त्यानुसार ईडीने कारवाई करत 203.55 कोटींची स्थावर व 3.43 कोटींची जंगम मालमत्तेवर टाच आणली आहे. या सर्व मालमत्ता मुख्य कंपनी समृद्ध जीवन फुड्‌स इंडिया लि. व त्याच्या सहयोगी कंपन्या प्रॉपर्टी एग्रो इंडिया लि., समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑ. सोसायटी लि., समृद्ध जीवन कन्स्ट्रक्‍शन प्रा.लि., जीवन ज्योती कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि., समृद्ध जीवन ऑर्चड रिसॉर्ट प्रा लि., एस जे हॉटेल्स अँड हॉस्पिटालिटी प्रा.लि. यांच्या नावाने खरेदी करण्यात आल्या होत्या.

टाच आणण्यात आलेल्या मालमत्ता
1. समृद्ध जीवन फूड्‌स इंडिया लि. चे अमरावती, अकोला, पुणे, सोलापूर, चाळीसगाव, जिन्तूर, पंढरपूर, नाशिक, चंद्रपूर, संगमनेर, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, गोव्यातील म्हापसा व उत्तर प्रदेशातील लखनौ येथील जमीन, प्लॉट, ऑफिस, सदनिका व दुकाने- किंमत 36 कोटी 02 लाख
2. जळगाव, पुणे, सोलापूर येथील जमीन व प्लॉट; तसेच उत्तर प्रदेशातील नोएडा येथील प्रॉपर्टी एग्रो इंडिया लि. येथील कार्यालय-किंमत 33 कोटी 13 लाख
3. पुण्यातील जीवन ज्योती कन्स्ट्रक्‍शन प्रा.लि. ची जमीन व प्लॉट- किंमत 18 कोटी 75 लाख
4. समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑ.सो.लि चे रत्नागिरी व गुजरातमधील भडोच येथील व्यावसायिक इमारती व गाळे- किंमत दोन कोटी 36लाख
5. समृद्ध जीवन ऍग्रो इंडिया लि.(नंतर नाव प्रापर्टी एग्रो इंडिया लि.) याचे रत्नागिरी, चाळीसगाव, पुणे येथील जमीन व प्लॉट-किंमत पाच कोटी 52 लाख
6. समृद्ध जीवन कन्स्ट्रक्‍शन प्रा.लि. चे सातारा, पुणे व पुरंदर येथील जमीन व प्लॉट-38 कोटी 41 लाथ
7. महेश किसन मोतेवार यांच्या नावावरील पुण्यातील हवेली, कात्रज, धनकवडी येथील सदनिका, व्यावसायिक ठिकाणे- किंमत दोन कोटी 65 लाख
8. वैशाली महेश मोतेवार यांच्या नावावरील पुणे, सोलापूर, ठाणे येथील जमीन व सदनिका-दोन कोटी 44 लाख
9. रमेश व सुवर्णा मोतेवार यांच्या नावावरील जळगाव, पुणे, सातारा येथील जमीन, प्लॉट व कार्यालये-71 लाख 95 हजार
10. प्रसाद मोतेवार यांच्या नावावरील पुण्यातील हवेली, चाळीसगाव, येथील प्लॉट व जमीन-34 लाख पाच हजार
11. लीन महेश मोतेवार नावावरील रत्नागिरी व पुण्यातील मालठण येथील जमीन- किंमत 66 लाख 74 हजार
12. एस. जे. हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी प्रा.लि. नावावरील पुणे शिवाजीनगरमधील हॉटेल ऑर्चर्ड व पुणे- सातारा मार्गावरील ऑर्चर्ड रिसॉर्टस- किंमत 23 कोटी 33 लाख
13. महेश व वैशाली मोतेवार यांच्या नावावरील पुणे, हिंजवडी येथील रॉयल रेसिडेन्सि हे हॉटेल- किंमत 39 कोटी 22 लाख
14. ए. के. एव्हिएशन प्रा.लि. हेलिकॉप्टर (बेल 206 बी 3)

Web Title: mumbai news mahesh motewar property Confiscated