मुख्य आरोपीच्या वडिलांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

मुंबई - पाच लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अकबर पाशा या व्यक्तीला बुधवारी अटक केली. नाशिक येथे जप्त केलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह ऊर्फ सुका ऊर्फ पाशा हा अकबरचा मुलगा आहे. रफी किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये सुका पाशालाही सहआरोपी करण्यात आले आहे.

मुंबई - पाच लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अकबर पाशा या व्यक्तीला बुधवारी अटक केली. नाशिक येथे जप्त केलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह ऊर्फ सुका ऊर्फ पाशा हा अकबरचा मुलगा आहे. रफी किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये सुका पाशालाही सहआरोपी करण्यात आले आहे.

अकबर पाशा याचीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यांमुळे सुकाविरोधात "मोक्का'नुसार गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दहशत बसवण्यासाठी सुका आणि अकबर याने एका व्यक्तीला खंडणीसाठी धमकावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्‍टोबरमध्ये पहिल्यांदा या व्यक्तीकडे पाच लाखांची मागणी करण्यात आली. अकबर व पाशा या दोघांवरही अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम मागवण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी एक एक लाखाच्या हफ्त्यात ही रक्कम स्वीकारण्यासही होकार दर्शवला होता. याप्रकरणी किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हत्यारांच्या तस्करीप्रकरणी मुंबई पोलिसांनी अकबरला यापूर्वी अटक केली होती. 1995 मध्ये त्याच्याविरोधात किडवाई मार्ग पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. याशिवाय वडाळा टीटी आणि किडवाई मार्ग पोलिसांनी अकबरकडून परदेशी बनावटीचे पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर, सुरे जप्त केले होते. मनी लॉण्डरिंगच्या गुन्ह्यात माता रमाबाई मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याचे अनेक नातेवाईक पाकिस्तानात आहेत. त्याच्या मुलीचे लग्न पाकिस्तानी युवकाशी झाले आहे. त्यामुळे अकबर अनेकदा पाकिस्तानला जाऊन आल्याचे सांगितले जाते. वडाळा टीटी पोलिसांना एका गुन्ह्यात अकबरचे पाकिस्तानातील "एके- 47' हाती घेतलेले छायाचित्र सापडले होते. त्याच्यावर मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यांत दहापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सुका पाशा याला त्याच्या साथीदारांसह नुकतीच नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे 22 रायफल, 17 रिव्हॉल्व्हर आणि चार हजार 142 काडतुसे सापडली होती.

Web Title: mumbai news main accused father arrested