मुख्य आरोपीचा सहआरोपीवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - सहआरोपी माफीचा साक्षीदार होणार असल्याचे कळताच मुख्य आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातच त्याच्यावर हल्ला केला. हा थरारक प्रकार न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कोर्टरूम बाहेर गुरुवारी (ता. 8) दुपारी घडला.

मालाड येथील कुरार आप्पापाडा परिसरात 2011 मध्ये घडलेल्या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू आहे. मुख्य आरोपी उदय पाठक आणि सहआरोपी कल्पेश पटेल सुनावणीसाठी न्यायालयात आले होते. कोर्टरूम बाहेरच त्यांच्यात झटापट झाली. उदयने कल्पेशवर शस्त्राने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी आणि सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. उदयने कल्पेशच्या चेहऱ्यावर वार केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उदयला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. उदयने चप्पलमध्ये लपवून शस्त्र न्यायालय परिसरात आणले असावे, असा प्राथमिक संशय आहे. त्याने कल्पेशवर हल्ला का केला, याचा तपास पोलिस करत आहेत; परंतु कल्पेश माफीचा साक्षीदार होणार असल्याच्या रागाने उदयने त्याच्यावर हल्ला केला असावा, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news main criminal attack on other criminal