एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पाच लाखांची मदत 
राजेश मारु याच्या नातेवाइकांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

मुंबई : एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने रुग्णासोबत आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात घडली. राजेश मारू (32) असे या तरुणाचे नाव आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्‍टर सौरभ लांजेकर, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि आया सुनिता सुर्वे यांना अटक केली आहे. त्यांना सेवेतूनही निलंबित करण्यात आले आहे. 

राजेशच्या बहिणीची सासू लक्ष्मीबाई सोळंकी या नायर रुग्णालयात दाखल आहेत. सोळंकी यांचा एमआरआय काढून घेण्यासाठी राजेश शुक्रवारी सायंकाळी त्यांना घेऊन रुग्णालयातील एमआरआय रूममध्ये गेला होता. त्या वेळी त्याच्या हातात ऑक्‍सिजनचा सिलिंडर होता. चुंबकीय क्षेत्र असलेल्या या रूममध्ये धातूची वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे; मात्र एमआरआय मशीन बंद असल्याने सिलिंडर आत घेऊन जाण्यास हरकत नाही, असे तेथील वॉर्डबॉयने राजेशला सांगितले. त्यामुळे आत जाण्यासाठी राजेशने खोलीचा दरवाजा उघडताच तो सिलिंडरसह मशीनकडे खेचला गेला. त्या वेळी त्याचा हात मशीनमध्ये अडकला. त्याच वेळी सिलिंडरला गळती लागल्याने ऑक्‍सिजन राजेशच्या शरीरात गेल्याने त्याचे शरीर फुगले. काही वेळाने वॉर्डबॉयने मशीन बंद करून त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णालयातील ट्रॉमा केअरमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे राजेशचा मृत्यू झाल्याने दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्याच्या नातेवाइकांनी घेतला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे आलेले आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह राजेशच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या कार्यालयासमोर ठिय्याही ठोकला. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी डॉक्‍टर लांजेकर, वॉर्डबॉय चव्हाण आणि आया सुर्वे यांच्याविरोधात हलगर्जी दाखवल्याप्रकरणी भा. दं. संहितेच्या कलम 304 अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. 

पाच लाखांची मदत 
राजेश मारु याच्या नातेवाइकांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. 

रुग्णालयातील धक्कादायक घटना 
मुंबईतील पालिकेच्या एका रुग्णालयात एमआरआय तपासणी विभागात एका रुग्णाच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयातील एमआरआय तपासणी विभागात धातूची वस्तू नेण्यास मनाई असतानाही ती नेल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे आणि त्याला रुग्णालयातील कर्मचारी, तंत्रज्ञ जबाबदार असल्याचे कळतेय. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीमुळे त्या व्यक्तीचा नाहक जीव गेला ही रुग्णालय प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेची घटना आहे. पालिका रुग्णालय प्रशासनाने अशा घटनांची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कडक उपाययोजना करावी. 
- नंदकुमार पांचाळ, चिंचपोकळी

Web Title: Mumbai news Man Gets Sucked Into MRI Machine At Mumbai Hospital 2 Arrested