हे तर मानवनिर्मित भीतीचे सावट

हे तर मानवनिर्मित भीतीचे सावट

मौसम मस्ताना, अजिबात गरज नसताना.. पूर्वीच्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय... या वादळाचा शोध बहुधा अशोक सराफ यांनी लावला असावा, वेख्या विख्खी ओखी... आता कुणी विचारलं की वर्ष कसं गेलं तर एकच उत्तर ‘पावसात’... सासरेबुवा जावयाला, काय म्हणतंय वादळ? जावई म्हणतो, स्वयंपाक करतंय... अशा असंख्य विनोदांनी ओखीच्या भीतीदायक सावटाचा ताण हलका केला; पण प्रत्यक्षात मात्र मुंबईकर घाबरलेलाच होता. वादळाचे सावट दूर झाले असले, तरी आता धुरक्‍याचे सावट मुंबईकरांना सतावू लागलेय. गेल्या आठवडाभरात ओखीमुळे नेमके काय घडले होते? 

ओखी हे नैऋत्य मोसमी ऋतुमानातील यंदाचे पहिले चक्रीवादळ. या काळात बंगालच्या उपसागरात असंख्य वादळे तयार होतात. वर्षागणिक आपल्याकडे पाच वादळे येतात. त्यापैकी चार बंगालच्या उपसागरात आणि एक हिंदी महासागरात येते. बंगालच्या उपसागरात येणारे चक्रीवादळ ओडिशा, विशाखापट्टणम, केरळ, तामिळनाडू किनारपट्टीवर थैमान घालते. तर हिंदी महासागरात येणारी वादळे आखाती देशांकडे वळतात. यापैकी क्वचित एखादे वादळ अरबी समुद्राजवळ येते. अरबी समुद्रात येणाऱ्या वादळाचे प्रमाण दर १० वर्षांतून एकदा आहे. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात वादळ तयार होण्याची शक्‍यता केवळ २० टक्केच असते. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या वादळांमध्ये तीव्रताही फार दिसून येत नाही. याआधी २००९ मध्ये फियान वादळ मुंबई आणि अलिबागमध्ये येऊन धडकले होते आणि ११ नोव्हेंबर २००९ रोजी धडकलेल्या या वादळाने नोव्हेंबर महिन्यांत जोरदार पर्जन्यवृष्टी केली होती.

नुकत्याच आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आता दिसू लागले आहे. तब्बल सात वर्षांनंतर राज्याच्या किनारपट्टीने हे वादळ अनुभवले. सुदैवाने ओखी चक्रीवादळ सुरुवातीपासूनच अरबी समुद्रात सुरक्षित अंतरावर होते. अरबी समुद्रात शिरताना गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातची दक्षिण किनारपट्टी या भागांत ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पावसाची शक्‍यता होती; परंतु वादळ जसजसे पुढे सरकणार तसतसे त्याची तीव्रता कमी राहील, हे स्पष्ट होते. तरीही लोकापर्यंत ही माहिती पोहोचवण्यास संबंधित यंत्रणा बऱ्याच कमी पडल्या. परिणामी, ओखी वादळाच्या पूर्वनियोजनाला म्हणावे तसे यश आले नाही.

गेल्या रविवारपासून सर्व यंत्रणा कामाला लागल्या. मंगळवारी उत्तर कोकण किनारपट्टीजवळून ओखी चक्रीवादळ जाईल, त्या वेळी या प्रभावामुळे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, हा इशारा दिला गेला. प्रत्यक्षात सोमवारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने खास बुलेटिन जाहीर केले. त्यात उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रातील पावसाची ठिकाणे वर्तवली गेली. हा अंदाज चार दिवसांपूर्वी दिला गेला असता, तर पूर्वनियोजनाच्या हालचालींना वेग आला असता. ओखी वादळाच्या चर्चेपेक्षाही त्याची भीती जास्त राहिली. कारण ओखी चक्रीवादळाची माहिती जनसामान्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचली नाही.

सुदैवाने या चक्रीवादळात मोठी हानी झाली नाही. अचानक वादळ आल्यानंतर अपेक्षित असलेल्या गोष्टींच्या पूर्वनियोजनातला ढिसाळपणा समुद्रावर उपजीविका असणाऱ्या मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका देऊन गेला. त्यामुळे संबंधित नियंत्रणाची पूर्वनियोजनाची तयारी नसणे पदोपदी जाणवली. २००९ मध्ये मुंबई आणि अलिबाग किनारपट्टीदरम्यान धडकलेल्या फियान वादळातून आपण काहीच शिकलो नाही, हेही यातून जाणवत होते. ओखीमुळे फियानसारखाच मुंबईत पाऊस पडेल, असा धसका मुंबईकरांनी घेतला; पण सोशल मीडियावर मात्र विनोदी मॅसेज फिरत होते.

ओखी राज्याच्या किनारपट्टीवरून जात असताना तीव्र नसणार हे केंद्रीय वेधशाळेने अगोदरच स्पष्ट केले होते. तरीही मुंबईकर पुरते घाबरले. शाळांना सुट्टी देण्यात आली. बहुतेकांनी घरी राहणे पसंत केले. प्रत्यक्षात मात्र ओखीमुळे मुंबईत फक्त ३६ मिमी पाऊस झाला. मंगळवारी सकाळी ओखी चक्रीवादळ मुंबईपासून ३०० किलोमीटर लांब होते. सुदैवाने सोमवारी मध्यरात्रीच अपेक्षेप्रमाणे ओखी वादळाची तीव्रता कमी होण्यास सुरू झाली.

त्याचवेळी मुंबईनजीकच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली. ऐन थंडीच्या महिन्यात गारठवणारी थंडी अनुभवण्याऐवजी धो-धो कोसळणारा पाऊस पाहून मुंबईकर चांगलेच गोंधळले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाचा इशारा मिळाला की, प्रत्यक्षात किती मिलीमीटर पाऊस होणार आहे, हे समजल्याशिवाय नियोजन यशस्वी होत नाही. ३६  मिमी हा पाऊस मुंबईसाठी नवा नाही. पावसाच्या ऋतुत मुंबईत २०० मिमीपर्यंत पाऊस होतो. या वेळी पावसाची तीव्रता अंदाजे ४० मिमीच्या आसपास राहणार ही पूर्वकल्पना असती तर कदाचित शालेय कामकाजाचा एक दिवस फुकट गेला नसता. सरकारी कार्यालये, लोकल ओस पडल्या नसत्या. मुंबईकर हसतखेळत या पावसाला सामोरे गेले असते; पण नेमके पावसाचे प्रमाण सांगितले गेले नसल्याने, कोणीही मुसळधार पावसाचे नाव जरी काढले तरीही मुंबईकरांच्या मनात २६ जुलैची आठवण ताजी होते.

म्हणून मुंबईकर चार दिवस भीतीच्या सावटाखाली राहिले. ओखीनंतर आता मुंबईकरांना धुरक्‍याचा सामना करावा लागतोय. हवेच्या प्रदूषणाची ही पातळी दिल्लीतील प्रदूषणाएवढी झाली आहे. त्यामुळे वादळाच्या आधीची नेमकी पूर्वसूचना आवश्‍यक होती. तसे आता या प्रदूषणाचे भयंकर परिणाम रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. धुरक्‍याच्या संकटातून वाचण्यासाठी पुन्हा एकदा निसर्गाची हाक लक्ष देऊन ऐकण्याची आवश्‍यकता आहे. 

चक्रीवादळ असो वा अतिवृष्टी, निसर्गाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही; परंतु प्रत्यक्षात त्याची पूर्वकल्पना वेळेवर दिल्यास जनजीवन आणि आर्थिक हानी टाळू शकलो असतो; पण आता निसर्गाची हाक ऐकत धुरक्‍याच्या सावटावर मात करण्यासाठी प्रशासन आणि जनतेने एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com