मारहाणीचे खुलासे देण्याची तयारी - कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - भायखळा तुरुंगात मृत्यू झालेल्या कैदी मंजुळा शेट्येच्या मारहाणीला वाचा फोडण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका आमदार रमेश कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. ज्या काठीने मंजुळाला मारहाण झाली, ती लाठी आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू तुरुंग पोलिसांनी कॅंटीनच्या कचऱ्यात फेकल्या, असा दावाही याचिकेत केला आहे.

गैरव्यवहारांच्या आरोपांखाली आमदार कदम 30 दिवसांपासून तुरुंगात आहेत. मंजुळाच्या मारहाणीच्या घटनेचे साक्षीदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मंजुळाच्या मृत्यूचा मुद्दा आणि त्यासंबंधी महत्त्वाचे खुलासे करण्यासाठी अधिवेशनात उपस्थित राहण्याची संमती द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली. तुरुंगात घडणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा तपशीलही अधिवेशनात मांडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यासाठी सात दिवस अधिवेशनात हजेरी लावण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे.

न्या. रणजित मोरे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी याचिकेचा उल्लेख झाला. बुधवारी (ता. 2) त्यावर सुनावणी होईल. मंजुळाला मारहाण केल्यानंतर दोन हवालदारांनी चार पुरुष कैद्यांमार्फत सर्व लादी स्वच्छ करून जमिनीवर पडलेल्या वस्तू गोळा केल्या आणि कचऱ्यात फेकल्या; तसेच ज्या काठीने मंजुळाला मारहाण झाली, ती कॅंटीनच्या कचऱ्यात फेकण्यात आली. महापालिकेच्या कचरागाडीतून ती गाडी दुसऱ्या दिवशी नेण्यात आली, असेही याचिकेत म्हटले आहे.

Web Title: mumbai news manjula shetye death case