मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

महिला गार्डला पोलिस कोठडी

मुंबई : बहुचर्चित मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा तुरुंगातील महिला गार्डसह पाच तुरुंग अधिकाऱ्यांना शनिवारी (ता.1) गुन्हे शाखेने अटक केली. बिंदू नायकोडी असे महिला गार्डचे नाव आहे. तिला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महिला गार्डला पोलिस कोठडी

मुंबई : बहुचर्चित मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा तुरुंगातील महिला गार्डसह पाच तुरुंग अधिकाऱ्यांना शनिवारी (ता.1) गुन्हे शाखेने अटक केली. बिंदू नायकोडी असे महिला गार्डचे नाव आहे. तिला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

भायखळा महिला तुरुंगात नऊ दिवसांपूर्वी मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. मंजुळाच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांनी गदारोळ केला होता. तिचा मृत्यू मारहाणीत झाला, याच्या चौकशीकरिता महिलांनी घोषणाबाजी केली होती. मंजुळाच्या मृत्यूनंतर जे. जे. रुग्णालयात तिच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिला कैद्यांच्या तक्रारीवरून तुरुंगातील 6 जणांवर नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता; तर कारागृहात केलेल्या तोडफोडप्रकरणी दोनशेहून अधिक महिला कैद्यांवरही गुन्हा दाखल केला होता. मंजुळा मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली होती. या घटनेनंतर महिला आयोगानेदेखील तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास सांगितले होते; तर मंजुळा हत्येचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 कडे सोपवण्यात आला होता.

कारागृहातील तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या घटनेचा तपास नागपाडा पोलिस करत आहेत. मंजुळाला मारहाण दरम्यान बिंदूने तिचे पाय ओढल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्या आधारावर पोलिसांनी बिंदूला अटक केली. मारहाणीदरम्यान वापरलेले साधन पोलिसांनी अद्याप हस्तगत केलेली नाहीत.
दरम्यान, मंजुळाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या पाच तुरुंग अधिकाऱ्यांनाही शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मनीषा पोखरकर, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे अशी त्यांची नावे आहेत. शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने दिलेल्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे.

Web Title: mumbai news manjula shetye killed case arrested