ऑईलने भरलेले सुमारे 600 डबे फुटलेत आणि क्षणात पसरला आगडोंब; आगीमागे माफिया कनेक्शन ?

ऑईलने भरलेले सुमारे 600 डबे फुटलेत आणि क्षणात पसरला आगडोंब; आगीमागे माफिया कनेक्शन ?

मुंबई, ता. 05 : मानखुर्द मंडाळा परिसरातील भंगार गोदामाला शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास भीषण आग लागली.दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या व ज्वलनशील साहित्याने भरलेल्या या गोदामातील आगीनंतर येथे असलेले केमिकल, ऑईलने भरलेले सुमारे 600 डबे फुटल्याने आग क्षणात पसरून आगडोंब उसळला. ती आग पसरल्यामुळे 15 ते 20  गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने आगीत कोणीही जीवितहानी झालेली नाही.

आगीचे लोळ व काळाकुट्ट धुर दूरवर पसरल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून स्थलातर करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. अग्निशमन दलाने 19 गाड्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. 

मानखुर्द पूर्वेला 'मंडाळा' भागात 'कुर्ला स्क्रॅप' परिसर आहे. याच परिसरातील सुमारे 4 एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे, दुकाने इत्यादी व्यवसायिक स्वरुपाची बांधकामे अनधिकृतपणे उभी राहिली आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पासून काही अंतरावर असलेल्या या  झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनविण्याचे साहित्य, रद्दी, प्लास्टिक असे अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे इथे सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत असतात.  

शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास येथील एका भंगार ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामात केमिकल, ऑईलने भरलेले डबे होते. यातील 500 ते 600 डबे आगीनंतर फुटल्याने क्षणात ही आग पाच ते सात हजार चौरस फुटावर पसरली. आजूबाजूच्या गोदामात पसरून भडका उडाला. अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ वॉटर टँकर, बंबाच्या 16 गाड्य़ांसह घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरु केले. दलाने आग लेव्हल तीनची असल्याचे जाहिर केले. आग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरले.

धूराचे लोट  वाशीच्या खाडी पुलावरून दिसत होते. या परिसरात दाटीवाटीने गोदामे असल्याने आग वेगाने पसरत गेली. यात गोदामे 15 ते 20 गोदामे जळून खाक झाली. आग लागल्यानंतर येथील स्क्रॅप झोपडपट्टीतील, आजूबाजूच्या वसाहतीतील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली.  या परिसरात भंगाराच्या गोदामांना येथील झोपडपट्ट्यांना यापूर्वी अनेकवेळा आगी लागल्या आहेत. दीड - दोन  वर्षापूर्वी आणि त्यानंतर मागील वर्षी जून  महिन्यांत येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. जेव्हा आगी लागतात, तेव्हा प्रशासनाला  खड़बडून जाग आल्याप्रमाणे कारवाई केली जाते. अनेकवेळा पालिकेने येथील स्क्रॅप झोपडपट्टी, गोदामे, दुकानांवर कारवाई केली आहे. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने येथे पुन्हा गोदामे उभी राहतात. येथे  गोदामे मागील अनेक वर्षापासून अनधिकृतपणे उभी राहत आहेत. मोठ्या प्रमाणात भंगार व ज्वलनशील साहित्य ठेवले जाते, ठोसपणे कारवाई होत नसल्याने पुन्हा अनधिकृतपणे गोदामे उभी राहतात.

माफियांची दहशत असल्याने त्यांना विरोध करण्यास कोणी धजावत नसल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी सांगितले.भीषण आगीनंतर या मार्गावर आग विझवताना वाहतूककोंडी होऊ नये यासाठी बेस्टने येथील  वाहतूक दुसर-या मार्गावरून वळवल्या. शिवाजी नगर, छेडानगर,  मानखुर्द, नवी मुंबईत जाणा-या बसेस अमर महाल, चेंबूर नाका, व्हीएन पुरव मार्ग ते महाराष्ट्र नगर या मार्गाने वळवण्यात आल्या.

अग्निशमन दलाच्या मदतीला एचपीसील, बीपीसीएल 

गोदामात केमिकल , ऑईलने भरलेले डबे फुटल्याने आगडोंब उसळळा होता. आगीने रौद्ररुप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे  आवश्यकता भासल्यास अग्निशमन दलाने बीपीसील, एचपीसीएलच्या अग्निशमन यंत्रणेलाही मदतीसाठी सज्ज राहण्यास सांगितले. ऑईल, केमिकल मोठ्या प्रमाणात असल्याने आग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे एचपीसील, बीपीसीएलची फोन यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली. आवश्यकता भासल्यास या कंपनीची यंत्रणाही मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली होती. 

mumbai news mankhurd fire breakout blast of 600 drums of oil causes chaos in mankhurd

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com