मनोरा आमदार निवासातील खोलीचे छत ढासळले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे चर्चेत असलेल्या मनोरा आमदार निवासातील एका खोलीचे छत ढासळले. पाचोऱ्याचे आमदार सतीश पाटील यांनी दोन दिवसांनंतर मुंबईत कामकाजासाठी परतताच सोमवारी खोलीचा दार उघडले तेव्हा छत पलंगावर कोसळले होते.

या छताचा तुकडा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. आमदारांच्या सुरक्षिततेसाठी हे सरकार करणार तरी काय, अशा प्रश्‍न त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर त्वरित उत्तर देत "मनोरा'चे बांधकाम अत्यंत खराब दर्जाचे असून आमदारांना पर्यायी निवास व्यवस्था देण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. मनोरा आमदार निवासातील चारही टॉवर अत्यंत खराब अवस्थेत असून, तेथे राहणे कठीण झाले आहे. "मनोरा'ऐवजी पर्यायी जागा तयार करण्याचे गेल्याच आठवड्यात ठरले होते. मात्र, आज कोसळलेल्या या छताने हा प्रश्‍न अधिकच गंभीर बनला.

या तुकड्यात लोखंड कुठेही शोधून सापडते आहे काय, असा प्रश्‍न अजित पवार यांनी केला. विधानसभेत सर्वच पक्षाचे आमदार संतप्त भावनांना वाट करून देत होते. दीडशे वर्षे झाली तरी छत्रपती शिवाजी टर्मिनसला काही होत नाही मात्र, 20 वर्षांपूर्वी बांधलेला "मनोरा' का खचतो आहे, असा प्रश्‍न या वेळी आमदारांनी केला. दरम्यान, चेंबूर येथे आमदारांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news manora mla residence slab colapse