जमिनीसाठी शेतमजुराची सायकलवारी; 350 किलोमीटर प्रवास

प्रशांत बारसिंग
रविवार, 18 जून 2017

मुंबई - अंगावर मळकट-चुरगळलेला सदरा-पायजमा आणि गांधी टोपी; चपलेविना सुजलेले पाय आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदाचे भेंडोळे घेऊन मंत्रालयात न्यायासाठी आलेल्या शेतमजुराला बघून महसूल मंत्र्यांचे अख्खे कार्यालय थिजून गेले. काल घडलेल्या या घटनेमुळे गरिबीचे अत्यंत विदारक चित्र समोर आल्याने सर्वजण अवाक्‌ झाले होते.

मुंबई - अंगावर मळकट-चुरगळलेला सदरा-पायजमा आणि गांधी टोपी; चपलेविना सुजलेले पाय आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदाचे भेंडोळे घेऊन मंत्रालयात न्यायासाठी आलेल्या शेतमजुराला बघून महसूल मंत्र्यांचे अख्खे कार्यालय थिजून गेले. काल घडलेल्या या घटनेमुळे गरिबीचे अत्यंत विदारक चित्र समोर आल्याने सर्वजण अवाक्‌ झाले होते.

कृषिविषयक सधन समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावातील शेतमजूर नायकू बजरंग सुतार हा शेतमजूर न्यायासाठी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला होता. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गावातील शंकर कोळी याने त्याच्या सासऱ्याची दीड एकर जमीन अवघ्या एक हजार रुपयात गहाण घेतली होती. कालांतराने कोळी यांनी जमीन स्वतःच्या नावार करून घेतली. सासऱ्याला मुलगा नसल्याने नायकू सासरवाडीतच राहत आहे. परंतु हक्‍काची जमीन नसल्याने शेतमजुरी करून पोट भरत आहे. जमिनीचा तुकडा परत मिळावा म्हणून त्याने अनेक वर्षे स्थानिक प्रशासनाने दरवाजे ठोठावले; मात्र त्यात यश आले नाही. मजुरीच्या पै-पैतून वाचविलेले पैसे वकिलाला देऊन इस्लामपूर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयात तारीख पे तारीख पडत असल्याने निकाल लवकर देण्यासाठी महसूल मंत्र्यांनी न्यायालयाला विनंती करण्याची मागणी करण्यासाठी तो मंत्रालयात आला होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि अठरा विश्‍वे दारिद्य्रामुळे तो सायकलवरून मुंबईला निघाला. तीन दिवस आणि दोन रात्री प्रवास करून नायकू मुंबईत पोचला. त्याचे पाय अक्षरशः सुजले होते. पायात चप्पल नाही, अशा अवस्थेत त्याची कहाणी एकून चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यासह कार्यालयातील उपस्थित लोक थिजून गेले.

मंत्रालयात माणुसकीचा झरा
न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याने श्रीनिवास जाधव यांनी इस्लामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला. न्यायालयीन प्रक्रियेत नायकूची बाजू बळकट होण्यासाठी त्याला आवश्‍यक मदत करण्याचे निर्देश जाधव यांनी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आता गावाकडे कसा जाणार, असा प्रश्‍न जाधव यांनी विचारल्यावर पाय सुजल्यामुळे दोन दिवस फूटपाथवर आराम करून मग जाईन, असे नायकू म्हणाला. यावर जाधव यांनी त्याला अँटी चेंबरमध्ये नेऊन खर्चासाठी पैसे दिले आणि एसटीच्या टपावर सायकल टाकून जाण्यास सांगितले. तोपर्यंत खासदार संजय पाटील वैयक्‍तिक कामासाठी आले होते. त्यांना प्रसंग कळताच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: mumbai news marathi news maharashtra news cycle travelling