मरिन ड्राइव्हवर "सॅग-वे'वरून पोलिस गस्त 

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

काय आहे सॅग-वे? 
सॅग-वे हे दोन चाकी वाहन आहे. परदेशात सॅग-वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सॅग-वे इको फ्रेंडली वाहन आहे. इलेक्‍ट्रॉनिक बॅटरीवर ते चालते. तासाला 18 किलोमीटर असा त्याचा वेग आहे. या वाहनावरून सतत पाच तास गस्त घालता येते. सॅग-वे चालताना सोबत स्वयंचलित चाव्या ठेवाव्या लागतात. चाव्यांनीही त्याचा वेगही कमी-जास्त करता येतो. 

मुंबई - पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मरिन ड्राइव्हवर पोलिस आता सॅग-वे या इको फ्रेंडली वाहनावरून गस्त घालणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दोन "सॅग-वे' पोलिस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे हायटेक वाहन मुंबई पोलिस गस्तीकरता वापरणार आहेत. 

राणीचा कंठाहार अशी ओळख असलेल्या मरिन ड्राइव्हवर देशातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. पहाटेला उद्योजक, अभिनेते मॉर्निंग वॉकसाठी येतात. सुटीच्या दिवशी मरिन ड्राइव्हवर गर्दी असते. मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी या दोन किलोमीटरच्या परिसरात टप्प्याटप्प्यावर पोलिस तैनात असतात. पोलिसांना पायी गस्त घालणे त्रासदायक होते. त्यासाठी सायकलीवरून पोलिस मरिन ड्राइव्ह परिसरात गस्त घालतात. गस्तीमुळे महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार थांबले आहेत. 

दत्ता पडसलगीकर यांनी पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिस दलात काही बदल होत आहेत. पोलिसांना गस्तीकरता बुलेट दुचाकीही दिल्या आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी सॅग-वेवरून गस्त घालण्याबाबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यात सॅग-वेचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपाडा येथील पोलिस मोटर वाहन विभागात दोन सॅग-वे आणण्यात आल्या आहेत. त्यांना नवा लूक देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त (मोटार परिवहन विभाग) अतुल पाटील यांच्या टीमने सॅग-वेच्या चाचण्या केल्या. सॅग-वे चालवण्याचे प्रशिक्षण दोन पोलिसांना देण्यात आले. लवकरच दोन्ही सॅग-वे पोलिसांना गस्तीसाठी दिल्या जाणार आहेत. 

Web Title: mumbai news Marin Drive police