महापौर अखेर राष्ट्रवादीचाच?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नवी मुंबई - महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय चौगुले यांनी आयत्या वेळी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जयवंत सुतार यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. या निवडणुकीत विजयाची खात्री असल्याने आतापासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी त्यांचा सहयोगी पक्ष काँग्रेसमध्ये मात्र उपमहापौर पदावरून दोन गट पडल्याने शांतता पसरली आहे. 

नवी मुंबई - महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय चौगुले यांनी आयत्या वेळी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जयवंत सुतार यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. या निवडणुकीत विजयाची खात्री असल्याने आतापासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी त्यांचा सहयोगी पक्ष काँग्रेसमध्ये मात्र उपमहापौर पदावरून दोन गट पडल्याने शांतता पसरली आहे. 

महापालिकेच्या १११ सदस्यांपैकी राष्ट्रवादीने अपक्षांच्या मदतीने ५७ चा आकडा सहज पार केला होता; मात्र अपक्षांसोबत पाच वर्षे काढणे जिकिरीचे असल्याने काँग्रेसच्या १० नगरसेवकांची मदत घेऊन सत्ता अधिक मजबूत केली. शिवसेनेकडे ३८ व भाजपकडे सहा, असे एकूण ४२ नगरसेवक विरोधी पक्षाच्या गटात आहेत. तरीही शिवसेनेने काँग्रेसमधील एका नगरसेविकेची मदत घेऊन स्थायी समिती खेचून आणली होती. आता पुन्हा याच पद्धतीने राजकीय खेळी करून काँग्रेसच्या मदतीने महापौरपद खेचून आणण्याची तयारी शिवसेनेने केली होती. महापौरपदासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दोन महिन्यांपासून मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांमार्फत दबाव आल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. महापौरपदाच्या रिंगणात चौगुले असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाम फुटला होता. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नाराजांना गळी लावल्याने राष्ट्रवादी अल्पमतात येण्याची शक्‍यता होती; तर गरजेच्या वेळेला काँग्रेसच्या सात जणांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांना साकडे घातल्याने शिवसेनेचा महापौर होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली. चौगुलेंनी माघार घेताच घोडेबाजारातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी रातोरात घेतलेले पैसे परत दिले. त्यामुळे नाराजांचे धाबे दणाणले आणि गुरुवारी महापालिकेत होणाऱ्या महासभेत नाराज नगरसेवकांकडून ‘गड्या आपला पक्ष बरा’, असे म्हणत मतदान केले जाणार आहे. राष्ट्रवादीचे फुटीर, तसेच काँग्रेसचीही मते राष्ट्रवादीला मिळणार असल्याने सुतार यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा  झाला आहे.  

भाजप तटस्थ राहणार?
महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी माघार घेतल्यानंतर आता भाजपनेही या मतदानात तटस्थ राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून भाजपला दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा वचपा या निवडणुकीत काढला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुरुवारच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक तटस्थ अथवा अनुपस्थित राहिल्यास आश्‍चर्य वाटण्याची गरज नाही.   

हात वर करून होणार मतदान
महापालिकेच्या अडीच वर्षांच्या उर्वरित कालावधीसाठी महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज वाचले जाणार आहेत. यात पहिल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांकडून देण्यात येईल. त्यात कोणी माघार घेतली नाही, तर एका-एका उमेदवाराचे नाव पुकारले जाईल. त्यावर नगरसेवकांना हात वर करून मतदान करावे लागणार आहे. अशाच पद्धतीने उपमहापौर पदाचीही निवडणूक होणार आहे.

Web Title: mumbai news Mayor NCP