न्यायालय व पंतप्रधान कार्यालयातील नाते अनुभवले - मेधा पाटकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

पुरस्कारविजेत्या इंदवी तुळपुळे यांनी यापूर्वी काही पुरस्कार नाकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. हा पुरस्कार आपल्या घरच्यांचा असून त्यांच्या कौतुकाच्या थापेने माझ्यावर कामाची जबाबदारी वाढली आहे. यापुढेही आपण कष्टकरी, भूपीडित, मजूर, आदिवासी व शेतकरी यांच्यासाठीच कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केला

गोरेगाव - नर्मदा आंदोलनावेळी न्यायालयात चाललेल्या सुनावणीच्या निमित्ताने आम्ही न्यायालय आणि पंतप्रधान कार्यालयातील नाते अनुभवले आहे. एवढेच नाही, तर मुंबईतील मंत्रालय आणि न्यायालय यांच्यातील नातेही तसेच असल्याचा अनुभव आल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सांगितले.

गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा या वर्षीचा बाबूराव सामंत पुरस्कार ऍड. इंदवी तुळपुळे यांना देण्यात आला, त्या वेळी पाटकर बोलत होत्या. कै. मृणाल गोरे यांच्या कन्या अंजली वर्तक, मुक्ता नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार व ट्रस्टचे विश्‍वस्त युवराज मोहिते, प्रमोद निरगुडकर तसेच राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व समाजवादी विचारांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

मेधा पाटकर यांनी बाबूराव सामंत यांच्या आठवणी जागवल्या. ए. आर. अंतुले यांच्या सिमेंट घोटाळा ते अगदी इरोनपर्यंतच्या सामंत यांच्या आंदोलनांची तसेच आपल्या नर्मदा बचाव आंदोलनाचीही त्यांनी माहिती दिली. राज्यातील भाजप-शिवसेना आणि केंद्रातील भाजपप्रणित सरकारवर त्यांनी टीकेचे आसूड ओढले. शहरांच्या सीमेवरील खेडुत, गावाकडील शेतकरी, नदीच्या काठावरील ग्रामस्थ, कोळी आदींना धनिक देशोधडीला लावत असून धनिकांची सर्व नजर नैसर्गिक संसाधनांवर आहे. जमिनी, खनिजे, साधन-संपत्ती अदानीसारख्या व्यावसायिकाकडे जावीत यासाठी काही यंत्रणा कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरस्कारविजेत्या इंदवी तुळपुळे यांनी यापूर्वी काही पुरस्कार नाकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. हा पुरस्कार आपल्या घरच्यांचा असून त्यांच्या कौतुकाच्या थापेने माझ्यावर कामाची जबाबदारी वाढली आहे. यापुढेही आपण कष्टकरी, भूपीडित, मजूर, आदिवासी व शेतकरी यांच्यासाठीच कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केला.

सहकाऱ्यांच्या मदतीला धावेन
ठाणे जिल्हा आपली कर्मभूमी असली तरी जेथे जेथे सर्वसामान्यांवर अन्याय होईल, तेथे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला धावेन. यापुढेही जल, जंगल, जमीन, मूलनिवासी हेच आपले संघर्षाचे विषय असतील, असे ऍड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.
 

Web Title: mumbai news: medha patkar government judiciary