मेट्रो-3च्या भुयारीकरणाला वेग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या स्थापत्य कामाचे कंत्राट देऊन 18 महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामांना वेग आला आहे.

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या स्थापत्य कामाचे कंत्राट देऊन 18 महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामांना वेग आला आहे.

टीबीएम यंत्राद्वारे आतापर्यंत तब्बल 220 मीटर भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारपासून गोदावरी-1 या टीबीएम यंत्राद्वारे विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ या मार्गावरील भुयारीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला.

मेट्रो-3च्या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारी 74 पाईल बोरिंग मशिन्स, 29 डीटीएच मशिन्स, 73 खोदकाम करणाऱ्या मशिन्स, 500 ते 700 टन क्षमतेच्या 32 क्रेन्स कार्यरत आहेत. भुयारीकरणाच्या कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या सात टनेल बोअरिंग मशिन्स मुंबईत दाखल झाल्या आहेत. यापैकी पाच मशिन्समार्फत भुयारीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. आणखी एक मशीन महिन्याभरात भुयारीकरणासाठी सज्ज होणार आहे. या मार्गातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर चार लाख 26 हजार क्‍युबिक मीटर जमिनीचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचे सल्लागार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी, कर्मचारी वगळता सध्या 7 हजार 600 मनुष्यबळ प्रकल्पावर कार्यरत आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईकरांकडून मिळणारे सहकार्य कौतुकास्पद आहे.

त्यांच्या सहकार्यामुळे व प्रोत्साहनामुळे आम्हाला आतापर्यंतची प्रगती करणे शक्‍य झाले आहे, असे एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे यांनी सांगितले.

टीबीएम यंत्रणेचे नामांकरण
भुयारी मार्गाच्या कामाची प्रगती तातडीने लक्षात यावी यासाठी मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टीबीएम मशीनचे नामांकरण करण्यात आले आहे. कफ परेड ते हुतात्मा चौक येथील टीबीएम यंत्रणेला "सूर्या' नदीचे नाव दिले आहे. तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ग्रॅंट रोडपर्यंतच्या यंत्रणेला "वैतरणा', मुंबई सेंट्रल ते वरळीमधील यंत्रणेला "तानसा', सिद्धिविनायक ते शीतलादेवीमधील यंत्रणेला "कृष्णा', बीकेसी ते सांताक्रूझमधील यंत्रणेला "गोदावरी', देशांतर्गत विमानतळ ते आंतरराष्ट्रीय विमानतळमधील यंत्रणेला "तापी' आणि मरोळ नाका ते कार डेपोदरम्यानच्या यंत्रणेला "वैनगंगा' अशी नावे दिली आहेत.

Web Title: mumbai news metro-3 underground