मेट्रो का हिट? मोनो का फ्लॉप?

संतोष मोरे 
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळे "मार्ग' काढण्याचा प्रयत्न झाला. मेट्रो आणि मोनो हे त्यापैकीच. मात्र हे दोन प्रकल्प मुंबईच्या नियोजनातले दोन ट्रेंड दर्शवतात. योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी असेल तर काय होते आणि नसेल तर काय होते, याचे दिशादर्शन या दोन प्रकल्पातून होते. मेट्रोच्या यशातून आणि मोनोच्या अपयशातून शहाण्या झालेल्या प्रशासकांनी आणि नेत्यांनीच आता ठरवायचेय, मुंबईला नेमक्‍या कोणत्या मार्गावर न्यायचे ते... 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाजलेली होतीच. आधी ट्राम, नंतर बस, ट्रेन आणि आता मेट्रो आणि मोनो. सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक पर्याय आधुनिक मुंबई देत आहे. 

बस, लोकलनंतर प्रथमच सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो व मोनो रेल्वेचा पर्याय काही वर्षांपूर्वी खुला झाला. दोन्ही प्रकल्प मुंबई शहर विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) अंतर्गत सुरू करण्यात आले. पण गेल्या तीन वर्षांतल्या कामगिरीकडे नजर टाकली तर असे दिसते की, एकीकडे मेट्रो राणी सुसाट वेगाने धावतेय; तर दुसरीकडे मोनो डार्लिंगच्या मार्गात अडथळेच वाढताहेत. 

मुंबईत मेट्रोचा बोलबाला अनेक वर्षांपासून असला, तरी ती 25 वर्षांनंतर ट्रॅकवर आली, प्रतीक्षा प्रदीर्घ असली तरी मेट्रोमुळे मुंबई उपनगरीय वाहतूक गतिमान व सुखकर झाली हे नक्की. मेट्रोच्या वर्सोवा ते घाटकोपर या 11 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यामुळे तब्बल साडेचार लाख उपनगरीय प्रवाशांचा प्रवास वेगवान, सुखकर झाला. याउलट तांत्रिक अडचणी व आगीमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मोनो रेल्वेच्या मार्गातील अडथळे अजूनही दूर झालेले नाहीत. 

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 8 जून 2014 रोजी पहिल्या मेट्रो मार्गिकेचे उद्‌घाटन केले. यापूर्वी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जे प्रयत्न झाले होते, ते केवळ दक्षिण मुंबईपुरता विचार करून आखण्यात आले होते. उपनगरांतील प्रवासीसंख्या बेसुमार वेगाने वाढत होती, तरीही तेथील वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे सातत्याने दुर्लक्षच झाले. अखेर वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला आणि उपनगरीय प्रवाशांचा प्रवास जलद व सुकर झाला. उपनगरीय रेल्वेने एकदा एखाद्या स्टेशनपर्यंत पोहोचल्यावर इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाला किमान प्रत्येक किलोमीटरला आठ रुपये (शेअर रिक्षा असली तरी) आणि बससाठी साधारण तीन रुपये प्रवाशांना मोजावे लागतात. मेट्रोच्या प्रवासासाठी हाच खर्च अवघा दोन रुपये इतका आहे. तसेच त्यामध्ये कोठेही सिग्नलचा अडथळा, टोल नाक्‍यावरचा खोळंबा, प्रदूषण नाही. शिवाय वातानुकूलित डब्यांमुळे हा प्रवास सुखकर होतो, जो फायदा इतर सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमामध्ये मिळत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कमी वेळात लांबचा पल्ला गाठता येतो. 

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोचा मार्ग पश्‍चिम रेल्वेवरील अंधेरी व मध्य रेल्वेवरील घाटकोपर या सर्वांत जास्त वर्दळीच्या स्थानकांना जोडला गेला आहे. अंधेरी, घाटकोपर परिसरात असलेली खासगी कार्यालये, औद्योगिक वसाहतीत लाखोंच्या संख्येने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नागरिक कामाला येतात. पूर्वी बस-रिक्षाने येथून होणारा प्रवास हा खर्चिक व वेळखाऊ होता, मेट्रोमुळे तो जलद व सुकर झाला. मेट्रोचे स्थानक हे औद्योगिक वसाहतीच्या व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गाला जोडणारे असल्याने या वसाहतींमध्ये येणाऱ्या नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचणे सोईस्कर झाले, यामुळेदेखील मेट्रोच्या प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे. 

मेट्रोचे दहिसर-डी.एन.नगर, डी.एन.नगर-वांद्रे-मंडाळा, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली व कुलाबा-वांद्रे-सीप्झ या चार मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतील, असे सर्वेक्षण आहे. मात्र एकूणच मेट्रोचे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यावर संपूर्ण मुंबईच मेट्रोच्या जाळ्यात अलगद जाऊन बसेल, असे स्पष्ट दिसत आहे. दोन्ही उपनगरीय रेल्वेच्या प्रवासीसंख्येचा विक्रम भविष्यात मेट्रोचे सर्व प्रकल्प मोडतील, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. मेट्रोच्या अनेक मार्गांपैकी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर सर्वाधिक प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. अन्य मार्गांच्या तुलनेत हा मार्ग सर्वाधिक लांबीचा आहे. पूर्व व पश्‍चिम उपनगरे जोडणारा असा हा मार्ग असल्याने या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ अपेक्षित आहे. 

एकीकडे मेट्रो यशस्वी ठरत असताना मोनो रेलला मात्र अपेक्षित प्रवासीसंख्या मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण मोनोचे नियोजन करताना गरजेऐवजी केवळ कोणत्या मार्गावर ती उभारणे सोपे आहे, याचा विचार करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत मेट्रोच्या प्रवासीसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. उलट मोनोला गेल्या तीन वर्षांत अपेक्षित प्रवासीसंख्या गाठण्यातच अपयश आले आहे. आगीमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मोनो रेल्वेच्या मार्गातील अडथळे संपता संपत नसल्याचे चित्र आहे. सेवा बंद ठेवल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असतानाच चेंबूर ते सातरस्ता हा मोनोचा दुसरा टप्पा चालवण्यासाठी खासगी कंपन्यांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागवण्याची वेळ आली. सध्या मोनोचे व्यवस्थापन "स्कोमी' या मलेशियन कंपनीकडे आहे. 

मोनोचा पहिला टप्पा हा कमी वर्दळीच्या ठिकाणी सुरू करण्यात आला. त्यातील काही स्थानकांमध्ये लोकवस्ती कमी आहे. मोनोचा मार्ग चुकीचा तयार केला असून मोनोमधून उतरल्यावर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. तसेच मोनोची स्थानके हे हार्बर मार्गाला समांतर असल्याने प्रवासी पर्याय म्हणून हार्बर लोकलला प्राधान्य देतात. 

देशातील पहिली मोनो रेल्वे सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयोग चांगलाच महागात पडला आहे. मोनोच्या प्रवासातील पहिल्या 26 महिन्यांत तब्बल 159 कोटींचे नुकसान झाले आहे. वडाळा ते चेंबूर या मार्गावरील मोनो- 1 साठी रोज सरासरी सहा कोटी 11 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे; तर या प्रकल्पाच्या खर्चात आतापर्यंत 220 कोटींची अतिरिक्त वाढ झाल्याची कबुली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. 

मुंबईतील मोनो रेलच्या कारभारावर कॅगने ताशेरे ओढल्यावर यापुढे राज्यात मोनोचा कोणताही नवा प्रकल्प न राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मोनो रेल्वेचे ठाणे ते कल्याण, ठाणे ते वडाळा असे अनेक प्रकल्प प्रस्तावित होते. मुंबईसारख्या वर्दळीच्या शहराच्या ठिकाणी मोनो रेल्वे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोनोमधून दररोज पंधरा ते वीस हजार लोकांनी प्रवास करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात जेमतेम पाच हजार प्रवासी प्रवास करत असल्याने लाखोंचे नुकसान एमएमआरडीएला सहन करावे लागले. शिवाय मोनोचा पाया तकलादू असल्याचे ताशेरेही कॅगने ओढले. 

नोव्हेंबर 2017 मध्ये मोनो रेलच्या रिकाम्या कोचला आग लागली आणि मोनो रेलची वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एप्रिल आणि ऑक्‍टोबर 2017 साली मोनो बंद ठेवण्यात आली होती. एप्रिल 2015 ला कॅगने सादर केलेल्या अहवालात मोनो रेलच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

मोनो रेलच्या वडाळा ते सातरस्ता या दुसऱ्या टप्प्यात एक लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा केला जातोय. दुसरा टप्पा हा करी रोड, वडाळा महालक्ष्मी, लोअर परळ आणि दादर पश्‍चिम रेल्वेस्थानकाच्या जवळून जात असल्याने याला प्रवासीसंख्या अधिक लाभण्याची शक्‍यता आहे. दुसरा टप्पा सुरू झाल्यास काळी-पिवळी टॅक्‍सी सेवांवर त्याचा परिणाम होईल. 

त्यामुळे मुंबईच्या विकासाठी "मेट्रो का हिट' आणि "मोनो का फ्लॉप' या प्रश्‍नांची योग्य उत्तरे शोधणे महत्त्वाचे. या प्रश्‍नांच्या उत्तरातूनच मुंबईच्या विकासाची नेमकी दिशा सापडू शकेल. 

मध्य रेल्वेवरून पश्‍चिम रेल्वेचा अंधेरीपर्यंतचा प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांना दादरपर्यंत येणे भाग होते. या प्रवासासाठी लागणारा अधिक वेळ, लोकलमधील गर्दी यांचा सामना प्रवासीवर्गाला करावा लागत होता. मेट्रोमुळे प्रवाशांचा प्रवास जलद व सुखकर झाला. यामुळे मेट्रोला प्रवाशांची अधिक पसंती मिळत असल्याचे वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मोनो रेल तांत्रिक व व्यवहारीदृष्ट्या स्थिर नाही; त्यामुळे भविष्यात किती लोक त्यातून प्रवास करतील याबाबत साशंकता आहे. मोनो रेलने किमान दरमहा 4 ते 5 लाख प्रवाशांनी प्रवास करणे अपेक्षित आहे; मात्र प्रत्यक्षात हा आकडा एक लाखावरती जात नाही. एखादा अपघात झाल्यास प्रवाशांच्या सुटकेत अडचणी येतात. मोनोचा पहिला टप्पा हा हार्बरच्या खूपच जवळ आहे; त्यामुळे दोनऐवजी चार मार्गिका केल्या तर त्याचा उपयोग प्रवाशांना होईल, असे दातार म्हणाले. 

मोनोचे नियोजन करताना प्रवाशांचा विचार लक्षात घेतला नाही, त्यामुळे त्यांचे नियोजनच चुकले आहे. मोनो रेल प्रशासनाने त्याची योग्य देखभाल केली नाही. मोनो रेल सुरू करताना फक्त पहिला टप्पा सुरू केला, जो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यात मार्गिकेचे नियोजन चुकल्यामुळे अल्प प्रवासीसंख्या, कमी फेऱ्या, यामुळे मोनोला आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागला. त्यात मोनो रेलच्या कोचचे भाग त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे फक्त दोनच कोच कार्यरत होते. जर मोनोला आर्थिक नुकसानीच्या दरीतून बाहेर पडायचे असल्यास त्यांनी दोन्ही टप्पे 6 कोचसह एकत्र सुरू करावे. ज्यामुळे काही अंशी मोनोला आर्थिक बळ येईल, असे वाहतूक तज्ज्ञ ए. वी. शेणॉय म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news metro mono MMRDA