भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पक्षीय बलाबल 
भाजप : 61 
शिवसेना : 22 
कॉंग्रेस : 10 
अपक्ष : 2 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 0 
मनसे : 0 

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता मिळविली. भाजपने जोरदार मुसंडी मारत 95 पैकी तब्बल 61 जागांवर विजय मिळवला. भाजपला प्रमुख आव्हान असलेल्या शिवसेनेला 22 जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांच्या आठ जागा वाढल्या असल्या, तरी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा करिष्मा जाणवलाच नाही. कॉंग्रेसने दहा जागा मिळवल्या. अपक्ष दोन जागी निवडून आले. आश्‍चर्य म्हणजे, एकेकाळी पालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. मनसे आणि बहुजन विकास आघाडीलाही खाते उघडता आले नाही. 

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप व शिवसेनेत चुरशीची लढत होणार, असे बोलले जात होते; परंतु सर्वच चित्र बदलले. मतमोजणीनंतर भाजपची गाडी सुसाट धावत 61 जागांपर्यंत गेली. गेल्या निवडणुकीत भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. त्या यंदा दुप्पट झाल्या. शिवसेनेला गेल्या वेळी 14 जागा मिळाल्या होत्या. यंदा शिवसेनेच्या जागा आठने वाढल्या तरी त्यांचे मातब्बर नेते प्रताप सरनाईक आणि गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा करिष्मा न चालल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसलाही मतदारांनी नाकारले. 2012 च्या निवडणुकीत 19 जागा असणाऱ्या कॉंग्रेसला या वेळी दहाचा आकडा गाठता आला. मनसेला त्यांची एकमेव जागाही गमवावी लागली. बहुजन विकास आघाडीला तीन जागा होत्या; परंतु यंदाच्या निवडणुकीत एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. मीरा-भाईंदर महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची तर पार वाताहत झाली. पालिकेत गेल्यावेळी एकूण 26 जागा असलेल्या या पक्षाला एकही जागा न मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

फायदा-तोटा 
भाजपला 30 जागांचा फायदा 
शिवसेनेला 8 जागांचा फायदा 
कॉंग्रेसला 9 जागांचा तोटा 

मुख्यमंत्र्यांची किमया 
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्याची किमया केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांचा पुरता धुव्वा उडाला. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला घरघर लागली होती. पक्षाला संजीवनी देण्याचे प्रयत्न माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले; मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

Web Title: mumbai news mira bhayandar municipal corporation election