महाराष्ट्रातील गुणवत्तेला मिळणार प्रकाशकोंदण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

"सकाळ'च्या "मिस महाराष्ट्र 2018' स्पर्धेची घोषणा

"सकाळ'च्या "मिस महाराष्ट्र 2018' स्पर्धेची घोषणा
मुंबई - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, त्यांच्यातून दर्जेदार अभिनेत्री घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'तर्फे सोमवारी (ता. 15) मुंबईत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स पुरस्कृत "मिस महाराष्ट्र 2018' स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. अन्य स्पर्धांप्रमाणे केवळ सौंदर्याला नव्हे; तर तरुणींमधल्या कलागुणांना प्रकाशकोंदण मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा हेतूही या स्पर्धेतून साध्य होईल, अशी प्रतिक्रिया या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या स्पर्धेतील विजेत्यांना निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नानूभाई जयसिंघानी, दिग्दर्शक राजू पार्सेकर आणि मिलिंद कवडे यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. या वेळी उपस्थित अभिनेते, निर्माते अजिंक्‍य देव यांनीही विजेत्या तरुणींना आपल्या आगामी चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा या वेळी केली. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याला दाद दिली. काही अपरिहार्य कारणांमुळे महेश मांजरेकर या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी आवर्जून पाठवलेला संदेश या वेळी वाचून दाखवण्यात आला.

दिग्दर्शक राजू पार्सेकर, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता उमेश कामत, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, अभिनेते व निर्माते विजय पाटकर आदींच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत वाढली होती. "सकाळ'शी असलेले ऋणानुबंधही या वेळी मान्यवरांनी आवर्जून सांगितले.

"सकाळ'ने ही स्पर्धा आयोजित केली असल्याने त्यातून दर्जेदार अभिनेत्री पुढे येतील याची आम्हाला खात्रीच आहे, असे सांगत सर्वांनी स्पर्धेला पाठिंबा दिला.

"मुलींचे शिक्षण' या सामाजिक ध्येयाला ही स्पर्धा वाहिलेली असेल. या उदात्त हेतूबद्दलही उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. "सकाळ'चा नाट्यमहोत्सव, प्रीमिअर ऍवॉर्ड असो किंवा अन्य कोणताही उपक्रम असो, "सकाळ' म्हणजे दर्जाबाबत तडजोड होत नाही असा अनुभव उमेश कामत, विजय पाटकर, मिलिंद कवडे यांनी सांगितला. या स्पर्धेद्वारे "सकाळ' हिऱ्यांचा शोध घेईल, असा विश्‍वास समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला.

मुंबई-पुण्यातील तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळते; मात्र ग्रामीण महाराष्ट्रात किंबहुना आदिवासी भागातील तरुणींमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. सर्वांनाच मुंबई-पुण्यात राहणे शक्‍य होत नसल्याने संधीला मुकावे लागते. आदिवासी भागातील तरुणींना अनेकदा भाषेची समस्या जाणवते; मात्र "सकाळ'च्या मिस महाराष्ट्र स्पर्धेत चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तरुणींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या भविष्यालाही आकार देतील असे या वेळी स्पष्ट झाले.

"मिस महाराष्ट्र' स्पर्धेच्या जिल्हा स्तरावर ऑडिशन्स होणार असल्याने तालुक्‍यातील तरुणींनाही स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यातूनच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दर्जेदार अभिनयाची गुणवत्ता समोर येईल, असा विश्‍वास मृणाल कुलकर्णी, राजू पार्सेकर, समृद्धी पोरे आदींनी व्यक्त केला.

स्पर्धेची वैशिष्ट्ये
- पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चित्रपटात संधी
- जिल्हा स्तरावर ऑडिशन्स होणार असल्याने प्रत्येक तालुक्‍यातील तरुणींना सहभागी होता येणार
- स्पर्धकांना चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन
- तरुणींच्या कलागुणांना वाव देण्यास सर्वांगीण विकासाचा हेतू

Web Title: mumbai news miss maharashtra 2018 competition