'मिठी'चा होतोय दिवसाढवळ्या खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

रेडिमिक्‍स प्लॅंटमधून सिमेंटमिश्रित पाणी नदीपात्रात

रेडिमिक्‍स प्लॅंटमधून सिमेंटमिश्रित पाणी नदीपात्रात
मुंबई - दर वर्षी पावसाळ्यात मुंबईची "तुंबई' होण्यास जबाबदार असलेल्या मिठी नदीच्या गळचेपीमागचे गूढ उकलले आहे. दर वर्षी या नदीच्या सफाईसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही तिचा श्‍वास का कोंडतो, कुणामुळे कोंडतो, या प्रश्‍नांची उत्तरे "सकाळ'च्या हाती लागली आहेत. कुर्ला येथील जरीमरी परिसरातील "अशोका' या सिमेंटच्या रेडिमिक्‍स प्लॅंटमधून सिमेंट आणि रसायनमिश्रित पाणी सोडून नदीचा जीव घोटला जात आहे. या पाण्यामुळे नदीत सिमेंटचा थर जमा झाला असून, त्यामुळे पात्राची खोलीही कमी झाली आहे. प्रदूषणाची "मिठी' घट्ट करणाऱ्या या कृत्यामुळे भविष्यातही मुंबईला फार गंभीर परिणाम सोसावे लागणार आहेत.

मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी पालिकेने आतापर्यंत 700 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतरही मिठी नदीला आजही नाल्याचेच स्वरूप आहे. नदी किनाऱ्यांवरील कारखान्यांमुळे मिठीचा रोज खून पडत आहे; मात्र सरकारी यंत्रणा कायद्यातील तरतुदी दाखवत एकमेकांकडे बोट दाखवत उघड्या डोळ्यांनी नदीला तडफडताना पाहत आहेत. या नदीत रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या तब्बल 550 कारखान्यांवर महानगरपालिकेने कारवाई केली. त्यानंतरही असे प्रकार थांबलेले नाहीत.

"अशोका' या रेडिमिक्‍स प्लॅंटमधून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सिमेंट आणि रसायनमिश्रित पाण्यामुळे नदीपात्रात सिमेंटचा थर जमा झाला आहे. त्यामुळे नदीच्या सफाईतही अडचणी येत आहेत. अनेक महिन्यांपासून जमा झालेल्या या सिमेंटचा थर जेसीबीनेही तोडता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवक वाजिद कुरेशी यांनी पालिकेच्या "एल' प्रभाग समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

कारवाई तोकडी
नदीचा खून करणाऱ्यांवर पालिकेकडून होणारी कारवाईही तोकडीच आहे. नदी दूषित करणाऱ्यांवर पालिकेमार्फत विशेष दंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला जातो. संबंधितांना शिक्षा सुनावण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना असतो; मात्र अवघा दोन ते पाच हजार रुपयांचा दंड आकारून नदीच्या मारेकऱ्यांना मोकाट सोडले जाते आहे.

"अशोका' रेडिमिक्‍स प्लॅंटला नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी मिळत असल्याने त्या मंडळालाही पत्र पाठवून याबाबत माहिती देण्यात आली आहे. नदी दूषित करणाऱ्या कुर्ला परिसरातील 100 ते 125 कारखान्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
- अजितकुमार आंबी, सहायक आयुक्त, एल विभाग, मुंबई पालिका

आमच्या कंपनीकडून नदीत सिमेंटमिश्रित पाणी सोडले जात नाही. पालिकेने बजावलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिले आहे. मी सध्या बाहेरगावी आहे. प्रत्यक्ष पाहून तुमच्याशी बोलेन.
- सी. एन. वर्मा, प्रतिनिधी, "अशोका' रेडिमिक्‍स प्लॅंट

Web Title: mumbai news mithi river uncleaned water