भाजपचे काही आमदार नाराज - आशीष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - विदर्भातील भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांची कॉंग्रेसमध्ये "घरवापसी' झाली असतानाच भाजपमध्ये नाराज असलेल्या आमदारांची संख्या लक्षणीय असल्याचा दावा भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी गुरुवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भाच्या वेगळ्या राज्यासाठी वेळोवेळी दाखल केलेल्या असरकारी ठरावांचे विस्मरण होऊ देऊ नये, असेही ते म्हणाले. मराठी भाषकांची दोन राज्ये होणे योग्यच असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले देशमुख यांनी पक्षाने आपणास नोटीस बजावल्याचे मान्य केले; पण "मुख्यमंत्र्यांनी मी पाठवलेल्या पत्रांची उत्तरे द्यावीत. त्यानंतर माझी भूमिका पक्षाला कळवेन,' असे ते म्हणाले. भाजप माझा अपेक्षाभंग करणार नाही, असे सांगतानाच लवकरच विदर्भात दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख न करता त्यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याविषयी भूमिका सोडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. आशीष देशमुख हे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. पटोले यांच्याप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडणार का, या प्रश्‍नावर त्यांनी, "मला सर्व पर्याय खुले आहेत. काहींनी विचारणाही केली आहे; मात्र भाजप माझ्या मागणीकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी उत्तर दिले. 

"मेक इन इंडिया'त विदर्भासाठी घोषित झालेले प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत. वेगळे राज्य झाल्यास शेतकरी आत्महत्या तसेच बेरोजगारीचे प्रश्‍न सुटतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. माझी विदर्भ आत्मबळ यात्रा विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातून जाईल. दीक्षाभूमीपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. विदर्भातील आस्थेच्या 11 ठिकाणी यात्रेदरम्यान विशेष कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले. राज्याच्या इतिहासात प्रथमच डीपीडीसी फंडात 30 टक्‍क्‍यांची घट झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

Web Title: mumbai news MLA BJP ashish deshmukh