पक्षांतर केलेले नगरसेवक आमचेच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - पक्षांतर केलेले सहा नगरसेवक शिवसेनेत गेले असले तरी ते आमचेच नगरसेवक आहेत, असा दावा मनसेने गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे केला. शिवसेनेने मात्र मनसे आणि अपक्षांसह शिवसेनेच्या 94 नगरसेवकांच्या गटाची अभिलेखात नोंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या (ता. 12) निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांची सुनावणी कोकण आयुक्तांच्या मुंबईतील कार्यालयात झाली. उद्या पुन्हा सुनावणी होणार असून, त्या वेळी अंतिम निकाल लागण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी तीन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी मनसेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, हर्षला मोरे, अश्‍विनी माटेकर, परमेश्‍वर कदम आणि अर्चना भालेराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेची ही खेळी भाजपसह मनसेच्या जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेने कायदेशीर मार्गाने या नगरसेवकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

हे नगरसेवक शिवसेनेत गेले असले तरी ते रेल्वे इंजिन या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे ते मनसेचेच नगरसेवक आहेत. त्यांचा वेगळा गट तयार होऊ शकत नाही. तसे केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते. ते सहाही नगरसेवक शिवसेनेचे नाहीत, असा युक्तिवाद गुरुवारी मनसेने केला; तर या सहा नगरसेवकांबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत 94 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली. याप्रकरणी केवळ प्रशासकीय प्रक्रिया उरली असल्याची माहिती शिवसेनेनेचे नेते अनिल परब यांनी दिली. 

...तर शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन 
कोकण विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी शिवसेनेच्या 94 नगरसेवकांचा गट स्थापन करण्याचा निर्णय दिल्यास शिवसेना पालिकेत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. तसे झाल्यास मनसेसाठी तो मोठा धक्का ठरेल.

Web Title: mumbai news MNS politics shiv sena corporator