सावकारी करणाऱ्यांवर कारवाईसाठी परिपत्रक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा उठवत बेकायदा सावकारी करणारे एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळास दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने परिपत्रक काढून संबंधितांवर कारवाईच्या सूचना महामंडळाच्या स्थानिक प्रशासनांना दिल्या आहेत.

एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. अडचणीच्या काळात त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी एसटी कर्मचारी सहकारी बॅंक अस्तित्वात आहे. स्थानिक पातळ्यांवरही काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पतसंस्था स्थापन केल्या आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार सरकारी व सहकारी बॅंकांतून पतपुरवठा केला जाऊ शकतो; मात्र कर्मचाऱ्यांच्या अज्ञानाचा व आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेत काही जण खासगी सावकारीच्या माध्यमातून प्रतिमहिना दहा ते 30 टक्के या दराने पैसे व्याजाने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर, महामंडळाच्या आगारांच्या आवारात व्याजाने पैसे देणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात यावेत, असे आदेश महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

सावकारांना टाळण्यासाठी कर्मचारी गैरहजर
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी संबंधित व्यक्ती कर्ज घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याबाबतच्या तक्रारी रावते यांच्याकडे आल्या होत्या. या सावकारीविरोधात काही पोलिस ठाण्यात तक्रारीही नोंदवण्यात आल्या. एसटी प्रशासनाच्या चौकशीतही काही कर्मचारी-अधिकारी अशा प्रकारे सावकारी करत असल्याचे उघड झाले होते. त्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक कर्मचारी कामावर गैरहजर राहत असल्याचा परिणाम महामंडळाच्या कामकाजावर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

Web Title: mumbai news money lender crime divakar rawte