शंभरहून अधिक कैद्यांचा तुरुंगात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

'एचआयव्ही', संसर्गजन्य आजारांचा धोका, 2004 नंतरची आकडेवारी

'एचआयव्ही', संसर्गजन्य आजारांचा धोका, 2004 नंतरची आकडेवारी
मुंबई - तुरुंगातील डॉक्‍टरांची हलगर्जी आणि संसर्गजन्य रोगांमुळे 2004 पासून शंभरहून अधिक कैद्यांचा मृत्यू झाला आहे. "एचआयव्ही', क्षयरोग तसेच संसर्गजन्य आजारांमुळे सर्वांधिक कैद्यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. तुरुंगात मृत्यू झालेल्या आरोपींना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; पण तीन वर्षांपूर्वी दिलेल्या या आदेशाची अद्याप पूर्तता झालेली नाही.

मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा सुमारे पाचपट अधिक कैदी आहेत. हे कैदी न्यायालयात खटला सुरू होण्याची वाट पाहत आहेत. अनेकांचे खटले अद्याप सुरू झालेले नाहीत. अस्वच्छता आणि कैद्यांची वाढती संख्या यामुळे येथील कैद्यांना संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. तुरुंग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, 2004 ते 2007 या कालावधीत ऑर्थर रोड तुरुंगात 55 कैद्यांचा, तर 2015 ते 2017 या कालावधीत 24 कैद्यांचा मृत्यू झाली असल्याचे समारे आले आहे. 2015 ते 2017 या कालावधीत ठाणे तुरुंगात तब्बल 21 कैद्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारात समजले. कैद्यांच्या मृत्यूची माहिती उघड करता येत नाही, असे येरवडा तुरुंग प्रशासनाने भालेकर यांना माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात कळवले आहे.

न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता नाही
डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे कैद्यांचे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षांपूर्वी सादर केली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या "पब्लिक ग्रीव्हन्स सेल'कडे पाठवत समिती स्थापन करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणी समिती स्थापन झाली नसून, अहवालही तयार नसल्याने न्यायालयाच्या अवमानप्रकरणी अर्ज दाखल करणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.

Web Title: mumbai news more than 100 prisoner death in jail