चित्रपटगृहांत घुमणार स्वच्छतेचे सूर

चित्रपटगृहांत घुमणार स्वच्छतेचे सूर

नवी मुंबई - स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात नवी मुंबईला अव्वल स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेले नवी मुंबईचे स्वच्छतादूत प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी चार गाणी स्वखर्चाने तयार केली. त्यानंतर आता ते व्हिडीओ तयार करत असून तो शहरातील चित्रपटगृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी दाखवला जाणार आहे.  

जानेवारी २०१८ मध्ये होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून लिपिकापर्यंत शहर स्वच्छ करण्याचा जणू ज्वर चढला आहे. यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छतादूत शंकर महादेवन काम करत आहेत. रोजच्या व्यस्त कामातून वेळ काढत महादेवन यांनी ‘गटारे तुंबू देऊ नका रे... पाण्याचा होऊ दे निचरा’, ‘वेगवेगळा टाकत जाऊ सुखा आणि ओला कचरा’, ‘नवी मुंबई स्वच्छ, सुंदर नंदनवन बनवूया’, ‘नवी मुंबई शहर आपले नंबर वन बनवूया’ अशी त्यांची जनजागृतीपर जिंगल्स नवी मुंबईकरांच्या पसंतीला उतरली आहेत. नवी मुंबई हे आपले शहर आहे, हे या गाण्यांतून रहिवाशांमध्ये बिंबवण्याचे काम महादेवन यांनी केले आहे. त्याचे संगीत व आवाज त्यांचाच आहे. त्यांचे हे जिंगल्स नवी मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात लावले जाते. स्वच्छतेचा संदेश व महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला आहे. आता महादेवन स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी व्हिडीओ तयार करणार आहेत. त्याचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर तो नवी मुंबईतील चित्रपटगृहांत दाखवला जाणार आहे. 

फिफाने दाखवला ठेंगा!
फिफाच्या यजमानपदाचा मान मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसर व शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत फिफासाठी पायघड्या घातल्या. फुटबॉलचे सामने सुरू असताना शंकर महादेवन यांनी तयार केलेले चार जिंगल्स स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ऐकवण्यात येतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र येथील सर्व सामने संपले तरी एकाही सामन्यात फिफाच्या आयोजकांनी महापालिकेने दिलेली जिंगल्स वाजवली नाहीत.   

मोहिमेत सक्रिय सहभाग
महापालिकेतर्फे शहरात वेळोवेळी आयोजित केलेल्या व राबवण्यात आलेल्या स्वच्छतेच्या कार्यक्रमांनाही शंकर महादेवन यांनी न चुकता हजेरी लावली. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या रबाळे येथील शाळेत झालेल्या समग्र स्वच्छता शिबिरात त्यांनी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. सीवूडस्‌मध्ये आयोजित केलेल्या वॉकेथॉनलाही त्यांनी हजेरी लावून जनजागृतीपर गाणी सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com