गैरसोईंमुळे एसटी चालक-वाहक संतप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मानखुर्द - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने विविध आगारांतून मोठ्या संख्येने जादा बस सोडल्या. त्यासाठी मुंबईबाहेरील आगारांतून जादा गाड्या मागवण्यात आल्या; परंतु त्यांच्या वाहक-चालकांना आवश्‍यक सोई-सुविधा अपुऱ्या पडल्याने त्यांनी बुधवारी (ता. 23) महामंडळाच्या विरोधात संताप व्यक्त केला. सोई-सुविधा पुरवण्याऐवजी गाड्या नेण्याबाबत दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केल्याने मानखुर्दमध्ये सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दोन हजार 216 जादा फेऱ्यांची व्यवस्था केली. मुंबईबाहेरच्या आगारांतून बस मागवण्यात आल्या. त्या उभ्या करण्यासाठी मानखुर्द आगारातील जागा अपुरी पडल्याने जकात नाक्‍याच्या जागी तात्पुरते वाहनतळ उभारण्यात आले. तिथे 500 बसची व्यवस्था करण्यात आली होती. बससोबत मोठ्या प्रमाणात चालक-वाहक मानखुर्दमध्ये आले होते. आवश्‍यक सोई-सुविधा नसल्याने त्यांचे हाल झाले. महामंडळाने आम्हाला कुठल्याच सोई पुरवल्या नाहीत, असा आरोप करीत त्यांनी संताप व्यक्त केला आणि गाड्या काढण्यास नकार दिला. रविवार (ता. 20)पासून तात्पुरत्या वाहनतळावर असलेल्या सुमारे एक हजार वाहक-चालकांना जेवण, पिण्याचे व आंघोळीचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहक-चालकांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. ही नाराजी मोडून काढण्यासाठी प्रशासन दमदाटी करीत पोलिस बळाचा वापर करत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. लांब पल्ल्याच्या प्रवासात बस चालवताना शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणे आवश्‍यक असते. प्रवाशांची जबाबदारी आमच्यावर असते. प्राथमिक सोई-सुविधाच मिळाल्या नाहीत, तर आम्ही सुरक्षित सेवा देण्यास सक्षम कसे राहू, असा सवालही त्यांनी केला. 

महामंडळाचे मुंबई विभागप्रमुख संजय सुपेकर आणि कुर्ला-नेहरूनगर आगाराचे महाव्यवस्थापक सुनील पवार यांनी संतप्त चालक-वाहकांची समजूत काढत पिण्याच्या पाण्याची व जेवणाची व्यवस्था केली. मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय वेर्णेकर जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी हनुमंतराव ताटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. 

मुंबईत मेट्रो व इतर प्रकल्पांची कामे सुरू असल्याने मुंबईबाहेरून मागवण्यात आलेल्या एसटी बससाठी वाहनतळाची व्यवस्था होऊ शकली नाही. म्हणून जकात नाक्‍याच्या जागेचा वापर केला. कर्मचाऱ्यांना प्राथमिक सोई पुरवण्याचा प्रयत्न आम्ही केला. 100 पर्यवेक्षकही नेमले. काही कर्मचाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला. त्यांची आम्ही समजूत काढली. 
- संजय सुपेकर (मुंबई विभागप्रमुख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) 

Web Title: mumbai news msrtc