पर्यटनाला लालफितीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - केंद्र सरकारचा मिळणारा अपुरा निधी, सीआरझेड आणि वनजमिनींच्या अडथळ्यांमुळे राज्यातील पर्यटन अडचणीत आले आहे. सरकारी लालफितीमुळे अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सोईसुविधा उपलब्ध होत नसल्याने राज्यात परदेशी नागरिकांच्या पर्यटनाला मोठा फटका बसत आहे, तर गुजरातमध्ये ही संख्या वाढल्याची माहिती पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई - केंद्र सरकारचा मिळणारा अपुरा निधी, सीआरझेड आणि वनजमिनींच्या अडथळ्यांमुळे राज्यातील पर्यटन अडचणीत आले आहे. सरकारी लालफितीमुळे अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सोईसुविधा उपलब्ध होत नसल्याने राज्यात परदेशी नागरिकांच्या पर्यटनाला मोठा फटका बसत आहे, तर गुजरातमध्ये ही संख्या वाढल्याची माहिती पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राची तुलना नेहमीच शेजारच्या गोवा राज्याशी होत असते. गोव्याबरोबरच राज्याला ७२० किलोमीटरचा भव्य समुद्रकिनारा लाभल्याने कोकणात पर्यटनाला मोठा वाव आहे. त्याचबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील सह्याद्री रांगा, मराठवाड्यातील अजंठा वेरूळ, लोणार सरोवर, विदर्भातील जंगल संपत्तीमुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक भेटी देत आहेत; मात्र गेल्या तीन वर्षांत लालफितीच्या कारभारामुळे राज्याचे पर्यटन अडचणीत आले आहे. कोकणातील पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी पर्यटन विभागाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन वर्षांपूर्वी विनंती केली असली तरी याबाबत अद्याप हालचाल झालेली नाही.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत उपलब्ध होणारा निधी राज्याच्या पर्यटन विभागाला थेट मिळत नाही. हा निधी राज्याच्या एकत्रित निधीत देण्याची नवीन पद्धत सुरू केल्याने संबंधित निधी पर्यटन विभागाला मिळण्यास बराच कालावधी लागतो. तसेच अनेक ठिकाणच्या प्रकल्पांसाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनी सागरी किनारा क्षेत्र विनिमय म्हणजेच सीआरझेड आणि वने विभागाशी संबंधित असल्याने त्यावरही ना हरकत मिळण्यास वर्षानुवर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध करता येत नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड अशा प्रकल्पांना झटपट परवानग्या मिळत असताना राज्य व केंद्र सरकार राज्याच्या पर्यटनाबाबत उदासीन असल्याची नाराजी अनेक स्तरावरून व्यक्‍त होत आहे.

महाराष्ट्र गेला  पाचव्या क्रमांकावर
तीन वर्षांपूर्वी देशी व परदेशी पर्यटकांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तसेच परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली असून, राज्याच्या तुलनेत गुजरातमध्ये पर्यटनस्थळे कमी असतानाही तेथील पर्यटक संख्येत वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

परदेशी पर्यटकांचे प्रमाण
 देशभरात     ११.६३ टक्‍के
 महाराष्ट्र     ११.६३ टक्‍के
 गोवा     ३४.१९ टक्‍के
 गुजरात     १७.३९

Web Title: mumbai news mtdc touriusm