मुंबई विमानतळावर दहशतवाद्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधाराने मुंबई विमातळावरून "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेचा संशयित दहशतवादी सलीम खान याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. सलीम हा लष्करे तैयबासाठी व पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्याही संपर्कात असल्याचा संशय आहे. 

सलीमविरोधात "लूक आऊट' नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामुळे रविवारी रात्री दुबईहून मुंबईत आला असताना त्याला विमानतळावर पकडण्यात आले. तो 2008 पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. त्याने 2007 मध्ये मुझफ्फराबादमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला दहशतवादी कौसर आणि शरीफ यांनी सलीमने आपल्यासोबत मुझफ्फराबादेत प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. 

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने मेमध्ये मुंबईतून जावेद नावीवाला व अल्ताफ कुरेशी यांना अटक केली होती. उत्तर प्रदेशातील लष्करी तळांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला देणाऱ्या आफताब अलीने हवालामार्फत पैसे पुरवल्याचा संशय होता. यातील अल्ताफ कुरेशीच्या संपर्कात असलेला परदेशातील हस्तक सलीमच आहे, असा सुरक्षा यंत्रणांना दाट संशय आहे. व्हॉट्‌सऍपमार्फत सलीम हा कुरेशीला लष्करे तैयबा व आयएसआयच्या हस्तकांना पैसे देण्याबाबत आदेश देत होता. त्या वेळी तो दुबईत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. आफताबलाही सलीम परदेशातून सूचना देत होता व कुरेशीमार्फत पैशांचा पुरवठा करत होता. सलीम मूळचा उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील बंदीपूर येथील आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएस सलीमची चौकशी करत आहेत. 

Web Title: mumbai news mumbai airport terriost