मुंबई बॉंबस्फोट खटला - दोषींना कठोर शिक्षा द्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांच्या "ब' खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेम, मुस्तफा डोसासह सहा जणांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने सोमवारी "सीबीआय'च्या वतीने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केली, तर बचाव पक्षाने न्यायालयात विविध अर्ज दाखल करत शिक्षेवरील युक्तिवाद पुढे ढकलण्याचे प्रयत्न केले. 

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांच्या "ब' खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेम, मुस्तफा डोसासह सहा जणांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने सोमवारी "सीबीआय'च्या वतीने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केली, तर बचाव पक्षाने न्यायालयात विविध अर्ज दाखल करत शिक्षेवरील युक्तिवाद पुढे ढकलण्याचे प्रयत्न केले. 

विशेष टाडा न्यायाधीश जी. डी. सानप यांनी शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोझ अब्दुल राशीद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी आणि करिमुल्ला शेख यांना या खटल्यात दोषी ठरवले. त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी आज केली. बचाव पक्षाने दोषींच्या शिक्षेविरोधातील युक्तिवाद सुरू करण्याची मागणीही केली. त्यावर सरकारी पक्षाने प्रथम युक्तिवाद करावा, असे बचाव पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 

दुसरीकडे बचाव पक्षाच्या वतीने विविध अर्ज दाखल करण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयावर युक्तिवाद करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्याची मागणी फिरोझ खानचे वकील वाहाब खान यांनी केली; मात्र ती न्यायालयाने फेटाळली. "या प्रकरणात शिक्षा कमी व्हावी यासाठी दोन-तीन साक्षीदार तपासायचे आहेत. ते साक्षीदार तळोजा तुरुंगात फिरोझसोबत होते,' असे फिरोझच्या वकिलांनी केलेल्या अन्य अर्जात नमूद आहे. हा अर्ज न्यायालयाने मान्य केला. फिरोझला मधुमेह व अन्य आजार असल्याने त्याच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने तळोजा तुरुंगाच्या अधीक्षकांना दिला. तुरुंगातील वतर्णूक चांगली आहे, हे न्यायालयाने शिक्षा देताना विचारात घ्यावे, असा अर्ज फिरोझने केला आहे. त्यावर फिरोजच्या वागणुकीबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने तुरुंगातील प्रोबेशन अधिकाऱ्यांना दिला. हे दोन्ही अहवाल 27 जुलैपूर्वी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळाली नसल्याने युक्तिवाद करता येणार नाही, असे मुस्तफा डोसाच्या वकिलांनी सांगितले. प्रत मिळाल्यावर अभ्यासासाठी वेळ मिळावा, असा युक्तिवादही त्यांनी केला. 

युक्तिवादाबाबत आज निर्णय 
न्यायालयाकडे आलेल सर्व अर्जांवर मंगळवारी (ता.20) सुनावणी करण्यात येईल. शिक्षेबाबतचा युक्तिवाद प्रथम सरकारी पक्षाने करावा की बचाव पक्षाने, याबाबत उद्या निर्णय देण्यात येईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

Web Title: mumbai news mumbai bombblast case