इमारत कोसळून मुंबईत 17 जण ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

15 दिवसांत चौकशी अहवाल 
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चौर आणि संचालक विनोद चिठोरे यांची समिती नेमली आली आहे. या समितीने 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. रहिवाशांनी केलेल्या आरोपांबरोबरच सर्व बाजूंनी चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - नर्सिंग होम बंद करून बार सुरू करण्यासाठी तळमजल्यावरील पिलर तोडल्याने घाटकोपर येथील "सिद्धीसाई' इमारत आज कोसळली. या दुर्घटनेत तीन महिन्यांच्या मुलीसह सतरा जणांचा मृत्यू झाला. या चार मजली इमारतीचा पिलर तोडल्यानंतर सोमवारी रात्री रहिवाशांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सकाळीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. चार वर्षांपूर्वी डॉकयार्ड येथे महापालिकेच्या इमारतीतील तळमजल्यावरील पिलर तोडल्याने इमारत कोसळून 61 जणांचा मृत्यू झाला होता. 

घाटकोपर येथील "सिद्धीसाई' इमारतीच्या तळमजल्यावरील तीन घरांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील सितप यांचे नर्सिंग होम होते. त्यांच्या पत्नी स्वाती सितप यांनी 2017 मध्ये शिवसेनेतर्फे महापालिकेची निवडणूकही लढवली होती. हे नर्सिंग होम बंद करून तिथे बार सुरू करण्यासाठी सितप यांनी घराचे नूतनीकरण सुरू केले होते. त्यांनी घराच्या भिंती पाडून पिलरही तोडला होता, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांनी सोमवारी रात्री बैठक घेऊन इमारत सोडण्याचा निर्णय घेतला होता; मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी 10.30 च्या सुमारास इमारत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाले. बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. 

या इमारतीतील रहिवासी लालचंद रामचंदानी यांनी सांगितले, की सितप यांना नर्सिंग होम बंद करून बार सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी तीन घरांच्या भिंतीही पाडल्या होत्या. पिलरही तोडल्याने धोका निर्माण झाला होता. याबाबत सितप यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

15 दिवसांत चौकशी अहवाल 
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चौर आणि संचालक विनोद चिठोरे यांची समिती नेमली आली आहे. या समितीने 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. रहिवाशांनी केलेल्या आरोपांबरोबरच सर्व बाजूंनी चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: mumbai news Mumbai Building Collapse Kills 17, Politician's House Was Being Revamped