शिवसेना रोखणार झाडांची कत्तल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

मुंबई : विकासाच्या नावाखाली प्रशासनाच्या संगनमताने भाजपने मुंबईतील झाडांची कत्तल करण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. प्रकल्पांच्या नावाखाली होणारी ही कत्तल आम्ही रोखू, असा दावा या पक्षाने केला आहे. 

मुंबई : विकासाच्या नावाखाली प्रशासनाच्या संगनमताने भाजपने मुंबईतील झाडांची कत्तल करण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. प्रकल्पांच्या नावाखाली होणारी ही कत्तल आम्ही रोखू, असा दावा या पक्षाने केला आहे. 

आम्हाला पर्यावरणाची काळजी असल्याचा दावा करणारा भाजप विकासाच्या नावाखाली पालिका प्रशासनाच्या संगनमताने झाडांची कत्तल करण्याचा उद्योग करत आहे, असा आरोप पालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांनी शनिवारी केला. शिवसेना हा डाव हाणून पाडील. प्रत्येक झाडावर शिवसेनेचा वॉच असेल. यापुढे झाडांची कत्तली होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. पक्षातर्फे 'झाडे जगवा, झाडे वाढवा' ही मोहीम राबवली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 

राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार पालिका आयुक्तांना झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याचा गैरफायदा घेत अनेक विकसक झाडे तोडण्यासाठीचे वेगवेगळे प्रस्ताव दाखल करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र नुकत्याच झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला. त्या वेळी वृक्ष वाचवण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला भाजपने पाठिंबा दिला; मात्र आता भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी त्यांच्या विभागात मुलुंडमध्ये झाडे तोडण्यासाठी प्रशासनाशी संगनमत करत परवानगी मिळवली. ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप जाधव यांनी केला. 

विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या मेट्रोसारख्या प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल सुरू झाली आहे. असे असताना आयुक्तांना झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार सरकारच्या अध्यादेशाने मिळाल्यामुळे मुंबईत झाडेच शिल्लक राहणार नाहीत, अशी भीती व्यक्त करतानाच पर्यावरणाच्या ऱ्हासाला जबाबदार कोण, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

Web Title: Mumbai news mumbai metro BMC shiv sena BJP