आजही अतिवृष्टीचा इशारा, मुंबई 'ओली'स! 26 जुलैच्या आठवणी ताज्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

शाळा-कॉलेज बंद राहणार

400 कोटी पाण्यात
पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने शहरात चार आणि पश्‍चिम उपनगरांत दोन अशी सहा उच्च क्षमतेची पम्पिंग स्टेशन बसवले आहेत. त्यासाठी 400 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक सेकंदाला दोन लाख लिटरहून अधिक पाण्याचा निचरा करण्याची या पम्पिंग स्टेशन्सची क्षमता आहे; मात्र या पम्पिंग स्टेशनचा मंगळवारी फारसा फायदा झालेला नाही. समुद्राला सायंकाळी 4.48 मिनिटांनी 3.23 मीटर उंचीची भरती होती. ही फार मोठी भरती नव्हती; मात्र वाऱ्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने शहरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकत नव्हता.

मुंबई : मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मंगळवारी पुन्हा 26 जुलै 2005च्या "महाप्रलया'च्या आठवणी जागवल्या. अनेक ठिकाणी पाणी साचू लागल्याने अवघे शहर जलमय झाले होते. दुपारनंतर, अधिकच रौद्ररूप धारण करणाऱ्या पावसाने देशाच्या आर्थिक राजधानीला जणू काही ओलीसच धरल्याचे चित्र होते. कितीही पाऊस पडला तरी मुंबईत पाणी साचणार नाही, या पालिकेचा दावाही या पावसात पुन्हा वाहून गेला.

सोमवारी रात्रीपासून पडणारा मुसळधार पाऊस नागरिकांना जणू येणाऱ्या संकटाचा ट्रेलर दाखवत होता. सकाळपासूनच नागरिकांच्या हाल अपेष्टांना सुरवात झाली. दुपारनंतर पावसाने विलक्षण जोर धरला. त्यामुळे आधीच साचलेले पाणी वाढू लागले. काही ठिकाणी ते छातीएवढे वाढले. दुपारनंतर दक्षिण मुंबईत येणारी रस्ते वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे सकाळपासून मध्य, हार्बर तसेच पश्‍चिम रेल्वेची लोकलसेवाही रडतखडत सुरू होती. दुपारनंतर ती ठप्पच पडली. रात्री उशिरापर्यंत लोकल वाहतूक रुळावर आली नव्हती. त्यातच पावसाचा रागरंग पाहून सरकारी-खासगी कार्यालये दुपारनंतरच सोडण्यात आल्यामुळे साऱ्याच यंत्रणांवरील ताण वाढला. लोकल सेवा बंद पडल्याने नागरिकांनी मिळेल ते वाहन पकडून घर गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र जागोजागी पाणी तुंबल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. संध्याकाळी पावसाचा जोर थोडासा ओसरला होता; मात्र रात्री तो पुन्हा वाढला.

2005 नंतरचा विक्रमी पाऊस
सकाळी 8 वाजल्यापासून 12 तासांत सांताक्रूझ वेधशाळेत 297 मि.मी.; तर कुलाबा वेधशाळेत 65 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत 26 जुलै 2005 नंतर एका दिवसात झालेला हा विक्रमी पाऊस आहे. 26 जुलै 2005 ला मुंबईत दिवसभरात 900 मि.मी. पाऊस झाला होता.

शाळा, कॉलेजांना आज सुटी
मुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Web Title: mumbai news mumbai rains alert heavy rains disruptions